कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्यावर गुरूवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या त्यांच्या मुळगावी महाडिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराकडून कर्नल संतोष महाडिक यांना मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज सकाळी कर्नल महाडिक यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील काल महाडिक यांना श्रद्धांजली वाहिली होती. याशिवाय, पोगरवाडीत महाडिक यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि सोलापूरचे छत्रपती मालोजीराजे भोसले आणि अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाडिक यांच्या अंत्यदर्शनासाठी आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती.
श्रीनगर येथील बेस कँपवर लष्कराकडून मानवंदना देण्यात आल्यानंतर संतोष महाडिक यांचे पार्थिव हवाई दलाच्या खास विमानाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर साताऱ्याच्या जिल्हा रूग्णालयात आणि आरेदारे गावात त्यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक (३९) शहीद झाले होते. महाडिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दाट जंगलाच्या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. तिचे नेतृत्त्व कर्नल संतोष महाडिक करीत होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तेथे त्यांना वीरगती प्राप्त झाली. महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. १९९८ मध्ये ते लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार घेणार- मुख्यमंत्री
अतिरेक्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या भारताच्या वीरपुत्राच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यात शहीद कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र महाडिकच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून त्यांची जबाबदारी सरकार घेईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matrya colonel santosh mahadik last procession and funeral in satara district