रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली व चिपळूण तालुक्यांमध्ये गावपातळीवरील वादातून तीन कुटुंबांना वाळीत टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
दापोली तालुक्यातील मुरडी गावातील चाचळवाडी येथील रामचंद्र शंकर गोरीवले यांना समाजाने गेली पंचवीस वर्षे वाळीत टाकल्याची कैफियत या कुटुंबाने पालकमंत्री सामंत यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये केली. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी अवैध लाकूडतोडीला विरोध केल्याच्या कारणावरून गावातील प्रमुख मंडळींनी त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केल्याचे उघड झाले आहे. या बहिष्कारामुळे पत्नीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठीसुद्धा ग्रामस्थांनी सहकार्य केले नाही, अशी तक्रार गोरीवले यांनी केली.
चिपळूण तालुक्यातील सरिता विनय चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले असल्याची तक्रार चव्हाण यांनी या वेळी केली. गावातील काही पुढारी मंडळी आपल्या मालमत्तेवर डोळा ठेवून गेली बारा वर्षे विविध प्रकारे त्रास देत आहेत. पण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही, असे त्यांनी नमूद केले. याच तालुक्यातील देवखेरकी येथील सुषमा कदम यांनीही समाजाने वाळीत टाकल्याची तक्रार केली आहे. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर ग्रामपंचायतीत शिपायाची नोकरीही गावातील पुढाऱ्यांनी नाकारल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री सामंत यांनी या तिन्ही तक्रारींबाबत तातडीने कारवाईचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील तीन कुटुंबांना वाळीत टाकल्याचे उघड
रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली व चिपळूण तालुक्यांमध्ये गावपातळीवरील वादातून तीन कुटुंबांना वाळीत टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
First published on: 02-10-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matter of three families ostracize disclose in ratnagiri district