जिल्हा तलाठी संघाने बांधलेल्या माउली सभागृहामुळे नगर शहराच्या वैभवात निश्चित भर पडली आहे. संघटनेने अतिशय देखणी आणि उपयोगी वास्तू नगरकरांना उपलब्ध करून दिली आहे. ही समाजसेवा अशीच निरंतर सुरू ठेवा, असे आवाहन नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी येथे केले.
जिल्हा तलाठी संघाने सावेडी रस्त्यावर बांधलेल्या माउली सभागृह या अद्ययावत नाटय़गृहाचे उद्घाटन गुरुवारी करीर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे होते. ज्येष्ठ सिनेनाटय़ अभिनेते डॉ. श्रीराम लागू व दीपा श्रीराम यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल कवडे, करमणूक कर विभागाचे उपायुक्त प्रल्हाद कचरे, महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर, नगर र्मचट्स बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तिमल मुनोत, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष योगिराज खोंडे आदी या वेळी उपस्थित होते.
करीर म्हणाले, सरकारी यंत्रणेने आता काळानुसार बदलले पाहिजे. आता राजा व प्रजा अशी स्थिती नाही. लोकशाहीत जनताच राजा आहे. यंत्रणा जुनी झाली असे म्हणून दोष देण्यापेक्षा नव्या बदलांशी समरस होता आले पाहिजे, असे करीर म्हणाले.
सोलापूरकर यांनी नगरच्या सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव केला. विशेषत: नाटय़क्षेत्रात नगरचे स्वतंत्र स्थान आहे, असे सांगून ते म्हणाले, राम नगरकर, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर असे एक ना अनेक दिग्गज अभिनेते नगरने दिले. आपल्या कारकीर्दीची सुरुवातही नगरलाच झाली. विद्यार्थिदशेतील पहिले पारितोषिक शारदा करंडकाच्या रूपाने मिळाले. व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोगही नगरलाच झाला, याची आठवण त्यांनी ताजी केली. माउली सभागृहाचे कौतुक करतानाच हे नाटय़गृह टिकवण्याची जबाबदारी आता नगरकरांची आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली. हे नाटय़गृह खराब होणार नाही याची काळजी आता नगरकरांनीच घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीला अमित बैचे यांचे दिग्दर्शन आणि संगीत संयोजनाखालील नांदी झाली. जिल्हाधिकारी कवडे, कचरे, मुनोत, खोंडे, कोकाटे, पी. डी. कुलकर्णी, पत्रकार बाळ बोठे यांची या वेळी भाषणे झाली. डॉ. लागू यांनी नाटय़गृहाला शुभेच्छा दिल्या. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष आर. आर. निमसे, टी. व्ही. सुतार, दिनकर घोडके आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर सभागृहाचे अध्यक्ष एल. सी. शेणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. माउली संकुलाचे अध्यक्ष बाबासाहेब हिंगे यांनी आभार मानले.