लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित पाचवी ‘राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन’ स्पर्धा रंगणार आहे. ‘रन फॉर हेल्थ अॅण्ड बिल्ड द नेशन’ हे या मॅरेथॉनचे ब्रीद आहे. यंदा महिलांसाठी अर्धमॅरेथॉन स्पर्धाही ठेवण्यात आली असून यजमान नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे हिला घरच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपद पटकाविण्याची संधी आहे.
स्पर्धेसाठी एकूण एक लाख ७५ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १४ वर्षांपासून संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून चार वर्षांपासून तिचे स्वरूप राज्य पातळी असे करण्यात आले. आतापर्यंत या स्पर्धेत नाशिकचे सावळाराम शिंदे, ठाण्याचे ब्रीजलाल बिंड (दोन वेळा) आणि चंद्रपूरचे नीलेश बोंडे यांनी विजेतेपद मिळविले आहे. स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून सकाळी सात वाजता रावसाहेब थोरात सभागृहाजवळील ‘मविप्र मॅरेथॉन चौक’ पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कुस्तीपटू सुशीलकुमार, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित राहणार आहेत. जुना गंगापूर नाका, विद्या विकास चौक, आनंदवल्ली, सोमेश्वर, हॉटेल गंमतजमत, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव व परत मविप्र मॅरेथॉन चौक असा स्पर्धेचा मार्ग आहे.
स्पर्धेतील विजेत्यास ५१ हजार रुपये, उपविजेत्यास ३१ हजार तर तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहेत. एकूण ११ क्रमांकापर्यंत रोख बक्षिसे तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विजेत्यांना चंदन, औदुंबर, कडुनिंब, तुळस व बेल या वृक्षांच्या पानांचा मुकूट चढविण्यात येईल. स्पर्धेत यंदा १४ गट राहणार असून आठ गट हे संस्थांतर्गत शाळा व महाविद्यालयांसाठी तर सहा गट हे राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी खुले आहेत. ४५ वर्षांवरील पुरुषांसाठी १२ किमी तर महिलांसाठी सहा किमी अंतर ठेवण्यात आले आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी स्वतंत्र गट असून त्याचे अंतर चार किलोमीटर आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक नीलिमा पवार यांनी केले आहे.