दलित, मागासवर्गीयांचे प्रश्न तसेच वाढती महागाई आदी समस्या निर्माण होण्यास देशातील काँग्रेस, भाजप व इतर पक्षच जबाबदार असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख खासदार मायावती यांनी केला. ‘सर्वजनहिताय सर्वजनसुखाय’ अशी परिस्थिती देशात आणायची असेल तर या पक्षांना पुन्हा सत्तेत न आणता बहुजन समाज पक्षाला केंद्र व राज्यात संधी द्या, असे आवाहन करून त्यांनी निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग या महाराष्ट्रस्तरीय महासंमेलनात फुंकले. कस्तुरचंद पार्कवर त्यांच्या सभेसाठी गर्दी उसळली होती.
त्या म्हणाल्या, १९५५पासून सुरू असलेले अनुसूचित जाती-जमाती कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण २००६ मध्ये बंद झाले तेव्हा केंद्र शासनात काँग्रेस व यूपीए सरकार होते. या सरकारने तेव्हा व त्यानंतर विधि तज्ज्ञांची मदत घेत प्रयत्न केले असते तर पदोन्नतीत आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई प्रभावीपणे लढता आली असती. मात्र या सरकारने काहीच केले नाही. बसपाने संसदेत व संसदेबाहेर यासाठी संघर्ष उभारला. राज्यसभेत ही लढाई जिंकली असली तरी लोकसभेत काँग्रेस व भाजपच्या छुप्या हातमिळवणीमुळे पदोन्नतीत आरक्षणाचा मुद्दा अडला. मागासवर्गीयांच्या एकाही संघटनांनी याविरोधात आवाज उठविला नाही, असा आरोप मायावती यांनी केला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून दलित, पीडित व शोषितांना विकसित समाजाच्या बरोबरीत आणण्यासाठी अनेक कायदेशीर अधिकार दिले आहेत. त्याची जातीयवादी मानसिकतेमुळे अंमलबजावणी फारशी झालेली नाही, असे त्या म्हणाल्या. गरिबी व बेरोजगारी वाढतेच आहे. त्यामुळे काहीजण नक्षलवादाकडे तर काही चुकीच्या मार्गाला लागले आहेत. या परिस्थितीस प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेले पक्ष जबाबदार आहेत. नवे कायदे करून आरक्षणासह काही अधिकार संपविले जात आहेत. केंद्र शासनाच्या एफडीआय व इतर धोरणांमुळं गरीब व मध्यमवर्गीय भरडले जात आहेत. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी अनेक आंदोलने झाली. बसपाने संसदेत आवाज उठविला तेव्हा कुठे काँग्रेस शासनाने रडत-रडत दहा एकर जागा दिली. बसपाला केंद्र व राज्य शासनात निवडून दिल्यास फुले, शाहू, आंबेडकरांची किमान शंभर एकरांचे अनेक स्मारके तसेच संग्रहालये उभारली जातील, असे आश्वासन मायावती यांनी दिले. बसपामध्ये अनेकांना जुळवून घ्या. त्यायोगेच तुम्हाला सत्तेची किल्ली हस्तगत करता येईल. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन मायावती यांनी केले. स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.  बसपा उच्चवर्णीयांच्या विरोधात नसल्याचे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खासदार सतीशचंद्र मिश्र यांनी स्पष्ट केले. पक्षाचे प्रभारी खासदार वीरसिंह, प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, शहर उपाध्यक्ष गोपाळ बेले व इतर पदाधिकारी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. 

Story img Loader