महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे महापौर बदल पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होते. ही पोटनिवडणूक दि. १४ जूनला होणार असून, या पार्श्र्वभूमीवर महापौर बदल महिनाभर लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.
मुकुंदनगर-गोविंदपुरा भागातील राष्ट्रवादीच्याच विजया अजय दिघे यांच्या निधनामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. त्यानंतर लगेचच ही आचारसंहिताही लागू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर बदलाबाबत पुन्हा साशंकता व्यक्त होते.
मनपात राष्ट्रवादी-काँग्रेस-मनसे-अपक्ष अशा आघाडीची सत्ता असून महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. महापौर संग्राम जगताप हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तेव्हापासून शहरात महापौर बदलाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीत हालचाली सुरू आहेत. माजी आमदार दादा कळमकर त्यासाठी आग्रही असून त्यांचे पुतणे अभिषेक कळमकर त्यासाठी इच्छुक आहेत. जगताप यांनीही या बदलाची तयारी दर्शवली आहे, मात्र राष्ट्रवादीतच वरिष्ठ पातळीवर त्यावर एकमत होत नसल्याने गेली सहा महिने चर्चा होऊनही महापौर बदलास अद्यापि मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच आता एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीची अडचण येऊ शकते. राजकीय मोर्चेबांधणी लक्षात घेता या पोटनिवडणुकीनंतर म्हणजे जूनच्या अखेरीपर्यंत हा बदल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
अगदी सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महापौर बदलाच्या दृष्टीने अनुकूलता दर्शवली होती. त्यानुसार नव्या निवडीची तयारीही सुरू झाली होती. मात्र विविध कारणांनी हा बदल लांबत गेला. आता अजित पवार हेच त्यासाठी अनुकूल नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच या हालचाली थांबल्या होत्या. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महापौर बदलास हिरवा कंदील दिला असल्याचे समजते. पक्षातच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये यावर भिन्न मते आल्याने हा बदला लांबतो आहे, असे समजते. दरम्यान, कळमकर यांनी मात्र बदलाच्या दृष्टीने जोरदार तयारी केली असून, अन्य मित्रपक्षाच्या नगरसेवकांचीही मोट त्यांनी बांधल्याचे सांगण्यात येते.
महापौर बदल पुन्हा लांबणीवर?
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे महापौर बदल पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होते. ही पोटनिवडणूक दि. १४ जूनला होणार असून, या पार्श्र्वभूमीवर महापौर बदल महिनाभर लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-05-2015 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor changes again on deferred