शहर बस वाहतुकीवरून (एएमटी) महनगरपालिकेत आता नव्या वादंगाची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थायी समितीने यात चुकीची भूमिका घेतल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. मात्र नगरकरांच्या सोयीचा विचार करून यात लवकरच योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन महापौर संग्राम जगताप यांनी दिले. यात कोणी राजकारण करीत असेल तर ते सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
एएमटीच्या वादाबाबत जगताप यांनी आज सायंकाळी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रश्नाचा आढावा घेऊन त्यांनी याबाबत काय मार्ग काढता येईल याचीही चर्चा केली. बैठकीनंतर ते म्हणाले, शहर बस वाहतुकीअभावी नागरिकांची होणारी गैरसोय महत्त्वाची आहे. याच दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहणे गरजेचे होते. व्यवस्थेचा कंत्राटदार प्रसन्न पर्पल या कंपनीला त्यांच्या मागणीनुसार लगेच नुकसानभरपाई वाढवून देणे अयोग्यच आहे, मात्र केवळ या एवढय़ा एकाच बाजूचा विचार करून चालणार नाही. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने शहर बस वाहतूक ही अत्यंत गरजेची आहे. कंत्राटदाराशी योग्य चर्चा करून उभयमान्य तोडगा काढणे गरजेचे होते, तेच आता आपण करणार आहोत.
आजच्या बैठकीत त्यादृष्टीने चर्चा झाली. ही सेवा बंद केल्याबद्दल मनपाने बुधवारीच प्रसन्न पर्पलला नोटीस पाठवली असून, कराराचे उल्लंघन केल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या कंत्राटदाराशी पुन्हा चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून अन्य पर्यायही तपासून पाहात आहोत असे जगताप यांनी सांगितले. नागरिकांचे हित लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर यातून मार्ग काढू असे ते म्हणाले.
दरम्यान, स्थायी समितीच्या निर्णयाबाबत मनपात आता सार्वत्रिक नाराजी व्यक्त होत आहे. नकारात्मक निर्णय घेताना स्थायी समितीने घाईच केल्याचे सांगण्यात येते. स्थायी समितीने कंत्राटदाराला नुकसानभरपाई देण्यास विरोध केला आहे, मात्र तेवढय़ाने प्रश्न सुटणार नाही. तेवढा सक्षम पर्याय आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच निर्णय करावा लागेल अशी भावना व्यक्त होत असून याच कारणावरून मनपात नव्या वादंगाची शक्यता व्यक्त होते.
सेवा सुरू राहण्यासाठी महापौर प्रयत्नशील
शहर बस वाहतुकीवरून (एएमटी) महनगरपालिकेत आता नव्या वादंगाची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थायी समितीने यात चुकीची भूमिका घेतल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. मात्र नगरकरांच्या सोयीचा विचार करून यात लवकरच योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन महापौर संग्राम जगताप यांनी दिले.
First published on: 20-06-2014 at 03:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor tries to stay service