देशभरातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू आणि कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी नाशिककरांना ‘महापौर चषक’ क्रीडा स्पर्धेनिमित्त मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पालकमंत्री छगन भुजबळ आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त धावपटू कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर अॅड. यतिन वाघ राहणार आहेत. स्पर्धेसाठी कुस्तीची तीन आणि कबड्डीची चार मैदाने तयार करण्यात आली आहेत. कबड्डीमध्ये पुरुष व महिलांचे प्रत्येकी १८ संघ सहभागी होणार असून कुस्तीमध्ये ही संख्या ७००पर्यंत जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत महापालिका स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे आणि नाशिक शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेनिमित्त ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपत खचनाळे, आशियाई सुवर्ण पदक विजेता काका पवार, माजी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, दादू चौगुले उपस्थित राहणार आहेत. कबड्डीपटू अशोक शिंदे, कोल्हापूरच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व ताराराणी क्लबच्या व्यवस्थापिका उमा भोसले, रमेश मेंडेगिरी हेही उपस्थित राहणार आहेत. कुस्तीच्या दोन मैदानांवरील सामने मॅटवर होणार आहेत. पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना अनुक्रमे ७५ हजार रुपये व महापौर चषक, ५१ हजार, ३१ हजार आणि २१ हजार रुपये याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. कबड्डीत महिलांमध्ये रचना स्पोर्ट्स क्लब व गुलालवाडी आणि पुरुषांमध्ये आर्टिलरी सेंटर, नाशिक पोलीस, किंग्ज स्पोर्टस् वेअर इंडस्ट्रिज, मनमाडचे निंबस वॉटर इंडस्ट्रिज या नाशिक जिल्ह्यातील संघांचा सहभाग आहे. ३५वी राज्यस्तरीय अिजक्यपद कुस्ती स्पर्धा, १७ वी ग्रीको रोमन राज्य स्पर्धा आणि नाशिक जिल्हास्तरीय महापौर केसरी कुस्ती स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार रुपये व महापौर चषक याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेचा समारोप ३० डिसेंबर रोजी होणार आहे. या वेळी राज्य कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह रमेश देवाडीकर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दौलतराव शिंदे, सचिव मोहन गायकवाड उपस्थित होते.
नाशिकमध्ये आजपासून ‘महापौर चषक कुस्ती व कबड्डी स्पर्धा’
देशभरातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटू आणि कबड्डीपटूंचा खेळ पाहण्याची संधी नाशिककरांना ‘महापौर चषक’ क्रीडा स्पर्धेनिमित्त मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पालकमंत्री छगन भुजबळ आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त धावपटू कविता राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
First published on: 26-12-2012 at 04:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor trophy kushti and kabaddi in nashik from today