शहर बस वाहतुकीसाठी आता महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांच्यासह महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांवरच आता आंदोलनाची वेळ आली आहे. या सर्वानी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयातच सोमवारी ठिय्या आंदोलन करीत या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मनपाचा हा प्रस्ताव तातडीने मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही या वेळी देण्यात आला.
मागच्या कंत्राटदाराने ही सेवा बंद केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून एएमटी बंदच आहे. मनपाने नवा कंत्राटदार शोधून त्याला हे काम दिले, त्याच्या गाडय़ा शहरात दाखल होऊनही आता महिना झाला. मात्र आरटीओ कार्यालयाने विविध तांत्रिक बाबींच्या मुद्दय़ावर हा प्रस्ताव अडवून धरल्याने शहर बस वाहतूक सुरू होऊ शकत नाही. आरटीओने तांत्रिक मुद्दय़ांवरच या प्रस्तावात बऱ्याच त्रुटी काढल्याचे सांगण्यात येते. त्याचा जाब विचारण्यासाठी जगताप यांच्यासह मनपाच्या स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, उपसभापती कलावती शेळके, नगरसेवक बाळासाहेब बोराटे आदींनी सोमवारी या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शहर बस वाहतुकीसाठी मनपाने पाठवलेला प्रस्ताव आरटीओने स्वीकारलेला नाही, त्याची कारणेही दिलेली नाही. याबाबत जगताप यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कांबळे सध्या रजेवर आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जगताप यांनी केवळ या कार्यालयाच्या आडमुठय़ा धोरणामुळेच शहर बस वाहतूक सुरू होत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे नगरकर जाम त्रस्त असून महत्त्वाच्या सुविधेपासून ते वंचित आहेत, असे ते म्हणाले. बराच वेळ ठिय्या दिल्यानंतर जगताप यांनी येथूनच कांबळे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून मनपाचा हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. या सेवेत अडथळे आणू नका अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जगताप यांनी या वेळी त्यांना दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा