सांगली बाजार समितीत शिपाई, लेखनिक पदाच्या नोकरीसाठी उच्च विद्याविभूषित तरुणांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये संगणक अभियंत्यापासून विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील पदव्युत्तर पदवी, एमबीए झालेल्या तरुणांचा समावेश आहे. केवळ १९ जागांसाठी १ हजार ४०० तरुणांनी ‘ऑनलाइन’ अर्ज भरले आहेत. सांगली बाजार समितीमध्ये कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, संगणक चालक, सेस लिपीक अशा १९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. भरण्यात येत असलेली पदे आरक्षित कोटय़ातील आहेत. या पदासाठी शिपाई, चौकीदार पदासाठी ९ वी उत्तीर्ण आणि लेखनिकसाठी शालांत परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता असताना या पदासाठी बी. ई. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हील, संगणक, टेलिकम्युनिकेशन या विद्याशाखांमध्ये पदवी प्राप्त तरुणांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच काही उमेदवारांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका घेतली आहे. तर काही तरुणांचे शिक्षण विविध विद्याशाखांतील पदव्युत्तर पदवीपर्यंत झालेले आहे.

Story img Loader