लातूर – लातूर शहरातील आंबेजोगाई रस्त्यावर एकास बेदम मारहाण करून दहशत पसरवणे, त्यापूर्वी दरोडे घालण्याची तयारी करणे, दहशत निर्माण करणे आदी कारवाया करणाऱ्या सात जणांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्या सातही जणांच्या विरोधात १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई रस्त्यावर किरकोळ कारणावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यावरून सात जणांना जेरबंद करण्यात आले होते. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी अनेक गुन्हे केले होते व त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र बाहेर आल्यानंतर किरकोळ कारणावरून त्यांनी भर रस्त्यात एका तरुणास मारहाण केली. त्यामुळे अजिंक्य नीळकंठ मुळे (वय २८़ जुना औसा रोड लातूर), बालाजी राजेंद्र जगताप (वय २७, रा गायत्री नगर, जुना औसा रोड, लातूर), अक्षय माधवराव कांबळे (वय २८, रा. दत्तकृपा सोसायटी, जुना ओसा रोड, लातूर), नितीन शिवदास भालके (वय २८, रा. आदर्श कॉलनी लातूर), साहिल रशीद पठाण (वय २४, रा. ड्रायव्हर कॉलनी, लातूर ), प्रणव प्रकाश संदीकर (वय २७, राहणार लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर) याबरोबर एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधातही शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षांपासून ही मुले वेगवेगळ्या कारणाने विविध स्वरूपाचे गुन्हे करत होते. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अंबाजोगाई रस्त्यावर घडलेल्या प्रकारानंतर या सर्वांच्या विरोधात मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.