धाराशिव : तुळजापूर येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंची साखळी दिवसेंदिवस उघड होत आहे. आजवर पोलिसांच्या विशेष पथकाने 12 जणांना आरोपी केले आहे. यापैकी फरार झालेल्या सहापैकी तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पकडण्यात आलेले तीन न्यायालयीन कोठडीत, तीन पोलीस कोठडीत तर आणखी तिघांचा तपास सुरू आहे.
तुळजापूर येथील अडीच लाख रूपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या तपासाला पोलिसांना दिवसेंदिवस यश येत आहे. या तपासातून आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ड्रग्ज पेडलर व ड्रग्जचे सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. ड्रग्जचे सेवन करणार्या लोकांच्या माध्यमातून ड्रग्ज पेडलर, तस्कर हाती लागतात का? याचा शोध घेतला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परंडा येथे ड्रग्जचे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टिने आरोपींना पोलीस कोठडीत घेवून तपास केला जात आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या तीन आरोपींना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आले. त्यानंतर या तीन आरोपींना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे यांना आरोपी करण्यात आले आहे.
यातील फरार झालेल्या तीन स्थानिक आरोपींना आता अटक करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात बाजू मांडत आहेत. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकूळ ठाकूर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असून आरोपींची साखळी दिवसेंदिवस उघड होत आहे.