अमृता फडणवीस यांचा पाठिंबा

‘मी टू’ हे वादळ आता धडकले असून हे एक प्रकारचे वैचारिक मंथन आहे. यातून अनेक प्रकरणे बाहेर पडत आहेत. या मोहिमेत बॉलीवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. ही मोहीम ग्रामीण भागातही गेली पाहिजे, असे मत अमृता फडणवीस यांनी मांडले.

येथे अहिल्या फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सॅनिटरी नॅपकिनविषयी जनजागृतीसाठी ‘सन्मान स्त्रित्वाचा..तिच्या निरामय आरोग्याचा’ कार्यक्रमाचेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित फडणवीस यांनी पत्रकारांशी सन्मान स्त्रित्वाचा या विषयावर संवाद साधला. मी टू चळवळीचे त्यांनी समर्थन केले. या निमित्ताने महिला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. यातील खरे काय, खोटे काय समोर येईलच. यानिमित्ताने असे काही प्रकार सभोवताली घडत आहेत हे लक्षात येत आहे. हे प्रकार बॉलीवूड किंवा शहरापुरता मर्यादित नाहीत. ग्रामीण भागातही असे काही प्रकार घडत असतील, तर त्या महिलांनीही पुढे येणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रिय मंत्री एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्याविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला. शबरीमाला मंदिरातील प्रवेशासाठी सर्वाना समान हक्क आहे. त्या ठिकाणी सर्वाना प्रवेश मिळालाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. महिलांनी आणि मुलींनी रुढी, परंपराना थारा न देता कोणताही न्यूनगंड न बाळगता सॅनिटरी नॅपकिन वापरावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader