तब्बल ३७ वर्षांपूर्वी कुपोषण मोजण्यासाठी मुलांचा दंड घेर मोजला जात असे. दंड जेवढा लहान, तेवढा मृत्यूचा धोका अधिक असा तो निकष. मधल्या काळात म्हणजे सन १९८५नंतर दंड घेराने कुपोषण मोजण्याची पद्धत बंद झाली. बालकाचे वय व त्याचे वजन यानुसार कुपोषणाची श्रेणी ठरविण्याची पद्धत पुढे आली. अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी कुपोषण ठरविण्याच्या निकषात विविध प्रकारांनी भर टाकली आणि आता पुन्हा मुलांचे कुपोषण दंड घेर मोजून ठरवावे, असे निर्देश महिला व बालकल्याण विभागाने अलीकडेच अंगणवाडी कार्यकर्तीना कळविले आहे.
ज्या बालकाचा दंड घेर ११५ मि.मी.पेक्षा कमी आहे, असे मूल तीव्र कुपोषित समजावे. त्यांच्यासाठी लाल रंगाची पट्टी वापरावी, तर ११५ ते १२५ दंड घेर असणाऱ्या मुलांसाठी पिवळय़ा रंगाची पट्टी ठरविण्यात आली आहे. तसेच कुपोषण नसणाऱ्या मुलांना हिरव्या रंगाची पट्टी वापरण्याचे ठरविण्यात आले आहे. अंगणवाडी कार्यकर्ती व तिच्या आईने दंड घेर कसा मोजावा, याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आता हाती घेण्यात आला आहे. खांद्यापासून ते कोपऱ्यापर्यंतच्या भागाचा मध्यबिंदू काढावा व तेथे कापडी पट्टी बांधून मुलगा कुपोषित आहे की नाही हे ठरवावे, असे कळविण्यात आले. या निकषाबरोबरच बालकांचे वजन नियमित घ्यावे, जेणेकरून त्याची दर महिन्यातील वजनाची प्रगती सहज कळू शकेल, असे निर्देश देण्यात आले. कुपोषणासाठी दंड घेर मोजण्याचा ३७ वर्षांपूर्वीचा निकष बंद का करण्यात आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अनुषंगाने डॉ. अभय बंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ही पद्धत निश्चितपणे चांगली आहे. शून्य ते ६ वयोगटातील दीड कोटी मुलांचे वजन घेणे ही तशी किचकट प्रक्रिया आहे. जी मुले गंभीर कुपोषित असतात, त्यांचा दंड घेर बघितला की तो कुपोषित आहे की नाही, हे सहज लक्षात यावे. वयानुसार वजन हा कुपोषण मोजण्याचा निकष तर दर महिन्याला सुरूच ठेवला जाणार आहे. वजन, उंची नि वय याचा परस्पर ताळमेळ कुपोषण ठरविताना महत्त्वाचा असतो. मध्यंतरीच्या काळात दंड घेर तपासला जात नव्हता, हे खरे आहे.’
३७ वर्षांपूर्वी कुपोषण ठरविण्याची दंड घेर मोजण्याची पद्धत का बंद केली गेली आणि आता नव्याने ती का सुरू करण्यात आली आहे, याची उत्तरे वरिष्ठ अधिकारीही देत नाहीत. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफने दंड घेर मोजण्याच्या पद्धतीवर अभ्यास केला असल्याचे मोघम सांगितले जाते. नव्या निकषासाठी महिला बालकल्याण विभाग प्रशिक्षणाचा धूमधडाका सुरू झाला आहे.
 राजमाता जिजाऊ कुपोषण निर्मूलन अभियानातील अधिकाऱ्यांनीही दंड घेर मोजण्याची पद्धत योग्य असल्याचे सांगितले. आता अंगणवाडी स्तरावर दंड घेर मोजण्यासाठी कापडी पट्टय़ा पुरविल्या जाणार आहेत.    

असे आहेत निकष..
*  ज्या बालकाचा दंडघेर ११५ मिमीपेक्षा कमी ते कुपोषित बालक
*  कुपोषित बालकासाठी लाल रंगाची पट्टी
*  ११५ ते १२५ मिमी दंडघेर असणाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाची पट्टी
*  कुपोषित नसणाऱ्या मुलांसाठी हिरव्या रंगाची पट्टी

Story img Loader