आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी येथे आलेल्या प्रसिद्ध समाजसेविका व ईशान्य मुंबईतील लोकसभेच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे व राजकुमार धूत, तसेच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर टीका केली.
‘आप’चे लोकसभेचे उमेदवार सुभाष लोमटे (औरंगाबाद) यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी पाटकर शहरात आल्या होत्या. जालन्याचे उमेदवार दिलीप म्हस्के या वेळी उपस्थित होते. बीडकीन परिसरात खैरे, धूत व दर्डा या नेत्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या जमिनी डीएमआयसी प्रकल्पातून जाणीवपूर्वक वगळल्या. शेतकऱ्यांच्या जमिनीवर विकास व्हावा, त्याचा लाभ नेत्यांना व्हावा, अशी पद्धतशीर रचना लावण्यात आली. हे फक्त येथेच नाही, तर राज्यात सगळीकडे सुरू आहे, असा आरोप पाटकर यांनी पत्रकार बैठकीत केला. ही लढाई विषमतेची, सामाजिक व आर्थिक पातळीवरची आहे, तशी राजकीय पातळीवरही ही लढाई आम्ही लढत आहोत. एक नोट एक व्होट या स्वरूपात ही लढत लढविली जात आहे. शहरात ४ हजार ४०० रुपये अशाप्रकारे मदत गोळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींना निवडणूक लढविण्यासाठी उद्योजक आढाणी यांनी मोठी मदत केली. केवळ रिलायन्सच नाही, तर देशातील इतरही अनेक उद्योगपतींनीही मोदींना आर्थिक पाठबळ दिले आहे. विकासपुरुष म्हणून मोदींची प्रतिमा उभी केली जात आहे. मात्र, ही प्रतिमा उभी करणाऱ्यांना प्रत्यक्षातला गुजरात माहीतच नाही, अशी टीकाही पाटकर यांनी केली. आपचे नेतृत्व सामूहिक आहे. कोणत्याही एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात निवडणुका लढवत नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा