शासनाच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या तसेच नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून पुनर्वसनाचे काम करताना काही मुद्यांवरून तीव्र मतभेदांमुळे विलग झालेल्या मेधा पाटकर आणि लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे या दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यां दहा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर प्रथमच एकत्र आल्या आणि अवघ्या सातपुडा पर्वतराजीतील कार्यकर्त्यांचे लक्ष तिकडे वेधले गेले. त्यास निमित्त ठरले, बाळशास्त्री जांभेकर द्विजन्मशताब्दीवर्षांनिमित्त नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालय, ऑल इंडिया न्यूज पेपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित एकलव्य प्रशिक्षण केंद्र यांच्यातर्फे आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे.
प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळपास दहा वर्षांनंतर आम्ही एकाच व्यासपीठावर प्रथमच एकत्र आल्याचे खुद्द पाटकर यांनीही मान्य केले. विशेष म्हणजे, सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींचे प्रश्न वा इतर कोणत्याही विषयात पाटकर यांची बहुतेकदा शासन विरोधी भूमिका राहिली आहे. परंतु, या कार्यक्रमात त्यांनी पर्यावरण वाचविणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती, संविधानानुसार प्रत्येक नागरीक, सामाजिक चळवळ, जन आंदोलन आणि प्रसारमाध्यमे या सर्वाची जबाबदारी असल्याचे नमूद केले. अजूनही वेळ गेलेली नसून पर्यावरण वाचविण्याचे आवाहन त्यांनी केले. दर्पणकारांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ब्रिटीश सत्तेविरुद्ध आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लढा दिला. याची जाणीव ठेवून आज सर्वकाही अनुकूल असलेल्या प्रसारमाध्यमांनी शासन, प्रशासन, सामाजिक चळवळी, जन आंदोलन यांच्या पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरण विषयक बारीकसारीक मुद्यांवर परखडपणे विश्लेषण करून योग्य मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे. आज पर्यावरणाबद्दल जी जनजागृती झाली, त्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित व माहिती-प्रशासनचे संचालक प्रल्हाद जाधव लिखीत व दिग्दर्शित ‘मेळघाट’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे, प्रतिभा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत यांनी उपक्रमांची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत  केले. वास्तविक, नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या व्यासपीठावर पाटकर यांनी येण्याची ही पहिलीच वेळ. एवढेच नव्हे तर, असा पहिलाच शासकीय कार्यक्रम असावा की, सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात विधान न करता समस्त घटकांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. अनेकार्थाने हा कार्यक्रम वेगळा ठरला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा