Shivsena Sanjay Raut Convicts Defamation Case : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत यांना न्यायालयाने २५ हजार रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो अधिक दृढ झाला आहे. आपली न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभूणेंची परंपरा आजही पाळत आहे. मला असं वाटतं की न्यायव्यस्थेवर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे. एक आई म्हणून आणि एक कुटुंबातील सदस्य म्हणून जर का कोणी माझ्या परिवारावर, माझ्यावर मुलांवर आणि माझ्या संस्थेवर बेताल वक्तव्य करत असेल तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. एक समाजसेविका म्हणून समाजाचं प्रबोधन करत असताना त्याचा आज दाखला समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं मेधा सोमय्या म्हणाल्या.

हेही वाचा >> Sanjay Raut 15 Days Jail : संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; मेधा सोमय्या यांचे मानहानी प्रकरण

संजय राऊतांच्या जामिनाची प्रक्रिया कोर्टात सुरू आहे. त्यांन जामीन मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल? राऊत पुढच्या कोर्टात गेले तर तुम्हीही जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “यावर आता कशाला विचार करायचा पुढचं पुढे पाहूयात. आज कोर्टाचे आदेश हातात मिळूदेत पण काय करायचं ते पाहूयात.”

दोन वर्षांनी शिक्षा झाली आहे, हा मोठा कालावधी वाटत नाही का? असंही त्यांना विचारलं. त्यावर त्या म्हणाले, “कोर्टाला जे आवश्यक आहे ते कोर्ट करतं. कालावधी लागला यापेक्षा त्यावर काय निकाल आला आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं.”

निवडणुकांच्या तोंडावर असताना राऊतांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोपही विरोधकांकडून केला जातोय. त्यावर मेधा सोमय्या म्हणाल्या, “मी राजकीय वक्तव्य देऊ शकत नाही, तो माझा अधिकारही नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नाही.”

नेमकं प्रकरण काय?

मीरा भाईंदर येथील १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medha somaiyas first reaction after sanjay rauts conviction in defamation case said sgk