पावसाच्या अंदाजावरून माझ्यात व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात निर्माण झालेल्या वादाला माध्यमे जबाबदार आहेत. मी पावसाचा अंदाज व्यक्त करताना लोकांमध्ये भीती पसरेल असे काहीच बोललो नव्हतो. मात्र, माध्यमांनी माझ्या अंदाजाचे उलट चित्र रंगवले, असे मत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.
भारतीय हवामान खात्याने दीर्घकालीन सरासरीच्या ८८ टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी त्याच्या वैज्ञानिक पाश्र्वभूमीचे गोडवे गायले. २०१४ मध्ये नैर्ऋत्य आणि ईशान्य मान्सून मोडीत निघाल्याचा हवाला देत हवामान खात्याचा अंदाज हा सर्वासाठीच चिंतेचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या भविष्यवाणीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
गुरुवारी मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हर्षवर्धन यांच्या भविष्यवाणीलाच थेट आव्हान दिले. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजासंदर्भात आपण खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली. त्यामुळे पाऊस किती टक्के पडेल यापेक्षा कुठे आणि केव्हा पडेल, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनावर किंवा उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यताच त्यांनी फेटाळून लावली. २०१४ चा हवाला देत गेल्या वर्षी कमी पावसातसुद्धा अन्नधान्य उत्पादन वाढल्याचे ते म्हणाले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्थिती चांगली असेल, असे ते म्हणाले. मात्र, अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन आर्थिक विकासाच्या दराला झळ बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
जेटली आणि डॉ. हर्षवर्धन यांच्यातील या मतभिन्नतेविषयी नीरीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. हर्षवर्धन यांना प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी आपल्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. पाऊस सरासरीपेक्षा यंदा कमी आहे, पण त्यामुळे घाबरून जाण्याचे किंवा चिंतेचे काहीच कारण नाही. प्रसारमाध्यमांनी आपल्या म्हणण्याचा अर्थ चुकीचा लावला, असे सांगून उद्भवलेल्या या वादाचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader