मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणं, ही मध्यप्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीतून वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणारं देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. एमबीबीएस किंवा मेडिकल यासारख्या शाखांचं शिक्षण इंग्रजी भाषेतूनच दिलं जाणार आहे, मात्र, विद्यार्थांना विषय समजून घेता यावा, यासाठी संबंधित विषयांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद केला जाणार आहे.

हेही वाचा- “भाजपाच्या महिला नेत्या ‘आयटम’…”, डीएमके नेत्याचं वादग्रस्त विधान

संबंधित योजनेची माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले, एमबीबीएस, मेडिकलनंतर नर्सिंग, डेंटल अशा अभ्यासक्रमाचं टप्प्याटप्प्याने अनुवाद करण्यात येणार आहे. यावर्षी एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीतून अनुवाद केला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही अभ्यासक्रम मराठीत अनुवाद केले जातील. पुढील वर्षापासून विद्यार्थांना संबंधित पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण हे इंग्रजीतच असणार आहे. पण ते विद्यार्थांना समजण्यासाठी सोपं जावं म्हणून त्याचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical and mbbs education will be in marathi girish mahajan rmm