पालकमंत्र्यांबाबत शिवसेनेतील नाराजी पुन्हा उघड

अलिबाग: अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभाला शिवसेनेचे तीनही आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्ह्यात महाआघाडीतील विसंवाद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना आमदारांच्या गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. शिवसेनेचे पदाधिकारीही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार आणि पाकलमंत्री आदिती तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेच्या तीनही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तीनही आमदारांनी या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

 अलिबाग तालुक्यातील उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचा भुमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्यप्रणालीने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

तर भाजपचे तीनही आमदार कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी मोठय़ा संख्येनी उपस्थित होते.

 शेकापचे जयंत पाटील गैरहजर

या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हेदेखील गैरहजर राहिले. चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पालकमंत्र्याबाबत नाराजी व्यक्त केली. आदिती तटकरे या शेकापच्या पाठिंब्यामुळेच पालकमंत्री पदावर विराजमान झाल्या आहेत. याचा विसर पडू देऊ नये असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे शेकापही आदिती तटकरे यांच्यावर नाराज असल्याची दिसून येत आहे.

भाजपचे तीनही आमदार अनुपस्थित

भाजपच्या तीनही आमदारांना या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेत रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांची प्रमुख अतिथी म्हणून नावे टाकण्यात आली होती. मात्र त्यांनीही या कार्यक्रमास अनुपस्थित राहणे पसंत केले.

सर्वाना सोबत घेऊन काम करा- बाळासाहेब थोरात

काँग्रेसमध्येही पालकमंत्र्यांबाबत नाराजी आहे. याच नाराजीचा धागा पकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर भाषणात आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांना सर्वाना सोबत घेऊन काम करा, असा सूचक टोला लगावला.

Story img Loader