प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवा कोलमडली असून, उद्या गुरुवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी २ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय डॉक्टर मूक मोर्चा काढणार आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर पवार यांना काँग्रेस सभापती प्रियांका गावडे यांचा अवमान केल्याच्या कारणावरून मारहाण केली. या मारहाणीनंतर पोलिसांत तक्रार करण्यास गेलेल्या डॉक्टरांना अॅस्ट्रॉसिटीची केस दाखल करण्याची धमकी देताच पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी तडजोडीअंती मागे घेण्यात आल्या होत्या.
निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील या घटनेची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शिवाय जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयांतील ओपीडी बंद ठेवण्यात आली. यामुळे बुधवार व गुरुवारी सर्व शासकीय रुग्णालयांत रुग्णांवर उपचार झाले नाहीत. डॉक्टरांच्या बाबत निरवडेतील तीसरी घटना असल्याने डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा दिला.
डॉक्टर्सना मारहाण करणारा गुन्हा अजामीनपात्र व्हावा म्हणून डॉक्टर्सची मागणी आहे. अधिवेशनात हा मुद्दा लक्षवेधी ठरावा म्हणून शासकीय डॉक्टर्सनी तब्बल तीन दिवस ओपीडी बंद ठेवण्याचा प्रसंग घडला.
वैद्यकीय अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असून, त्यांच्या खुर्चीत बसणे हा वैद्यकीय सेवेचा अपमान आहे. सभापतींनी खुर्चीवर बसून वैद्यकीय सेवेचा अवमान केला तर न्यायासाठी कोणाकडे जावे, असे डॉक्टर संघटनेने म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात डॉक्टर्सना वेळोवेळी त्रास दिला जात असल्याचे कारण पुढे करत सर्वच डॉक्टर्सनी ओपीडी सेवा बंद करण्याच्या आंदोलनात भाग घेतला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी तुळशीदास मोरे यांच्यासह मॅग्योचे अध्यक्ष डॉ. उमेश पाटील, सचिव डॉ. बी. एम. काळेल, उपाध्यक्ष पी. डी. वजराटकर, निवासी अधिकारी ए. जे. नलावडे, डॉ. अश्विनी माईणकर आदींनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली.
निरवडेतील मारहाणीविरोधात वैद्यकीय अधिकारी एकटवले आहेत. या सर्व डॉक्टर्सनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. माने यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी डॉक्टर्सनी प्रदीर्घ चर्चा करून उद्या गुरुवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्गात काँग्रेसकडून अधिकाऱ्यांना मारहाणीच्या, धमकाविण्याच्या घटना घडत असल्याने अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करतात. सर्वानाच जिल्हा असुरक्षित वाटत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वैद्यकीय सेवा व अन्य क्षेत्रांत काम करताना संरक्षण घेऊन काम करणे शक्य नाही, असेही अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.
आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवा कोलमडली असून, उद्या गुरुवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी २ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय डॉक्टर मूक मोर्चा काढणार आहेत.
First published on: 18-07-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical officers protest against health officer assault