विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणाबरोबरच संशोधन करण्यासाठी योग्य नियोजन करावे, असा सूर येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने आयोजित बैठकीत निघाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर होते. या प्रसंगी डॉ. शेखर राजदेरकर, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेन्टल रिसर्चच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. आर. वाय. आगरकर, एम. ए. रंगुनवाला दंत महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. पी. ए. इनामदार, नाशिकचे डॉ. श्याम अष्टेकर, डॉ. हेमंत जोशी, नाशिकच्या प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या उपव्यवस्थापक डॉ. चित्रा कामत यांनी सहभाग नोंदविला.
कुलगुरू प्रा. डॉ. जामकर यांनी, विद्यापीठाने संशोधनात्मक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले असून संशोधनास प्रोत्साहनासाठी विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जुन्या प्रबंधात किरकोळ बदल करून नव्याने सादर करण्याचे प्रकार टाळण्यासाठी विद्यापीठातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत, तसेच पदव्युत्तर शिक्षकांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्याकरिता प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. शेखर राजदेरकर यांनी, विद्यार्थ्यांना समृद्ध असा अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. विद्यापीठाकडून आरोग्य विज्ञान चरित्र कोष निर्माण करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉ. इनामदार यांनी संशोधनास चालना मिळावी या हेतूने प्रथम वर्षांपासूनच विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषयाची निवड करून त्यास प्रोत्साहित करण्यात यावे तसेच आर्थिक बाबतीतदेखील त्यांना मदत व्हावी, अशी सूचना केली.
 डॉ. हेमंत जोशी यांनी वैद्यकीय शिक्षणात मराठी भाषेचा वापर करण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली. विकिपीडियाप्रमाणे मराठीतून वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. केरळने त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणावर भर देत प्रगती साधली असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले. डॉ. अष्टेकर यांनी, विद्यापीठाने इंटरनेटवर मराठीत आरोग्य पेढी तयार करावी, या आरोग्य पेढीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, वाचक यांच्याकरिता प्रमाणित माहिती उपलब्ध करून द्यावी असे मत मांडले. या प्रसंगी डॉ. चित्रा कामत यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत कार्य करताना आलेला अनुभव सांगितला. डॉ. आगरकर यांनी संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी केले. यावेळी नियोजन मंडळाचे प्रभारी संचालक संजय नेरकर, के. आर. पाटील, उल्हास कुलकर्णी उपस्थित होते.

Story img Loader