येथील नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारताना आघाडीच्या उमेदवार मीना मालपेकर यांची सात विरुद्ध तीन मतांनी नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चमत्कार होण्याची राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा मात्र फोल ठरली.
नगराध्यक्ष निवडणुकीवरून पालिकेचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. या निवडणुकीसाठी आघाडीकडून काँग्रेसच्या मालपेकर तर, युतीकडून वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बहुमत असल्याने सत्ताधारी आघाडीच्या गोटामध्ये शांतता होती. मात्र बहुमताचे संख्याबळ गाठण्यासाठी युतीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्यामध्ये सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांशी संपर्कही साधण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले होते. अशा स्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये नगराध्यक्ष निवडणूक पार पडली. यामध्ये आघाडीच्या उमेदवार मालपेकर यांनी युतीच्या उमेदवार खडपे यांना सात विरुद्ध तीन मतांनी पराभव करीत ही निवडणूक जिंकली. त्यामुळे या निवडणुकीत वन टू का फोर करण्याचे युतीचे प्रयत्न अपुरे ठरले. मालपेकर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित होताच जवाहर चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करीत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नूतन नगराध्यक्षा मालपेकर यांचे विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, मावळत्या नगराध्यक्षा मुमताज काझी, विद्यमान उपनगराध्यक्ष जमीर खलिफे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा राजापूर अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन प्रसाद मोहरकर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा अनामिका जाधव, काँग्रेसचे पालिकेतील गटनेते जमीर खलिफे, राष्ट्रवादीचे गटनेते संजय ओगले, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, सिनेअभिनेत्री सविता मालपेकर, माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते सदानंद चव्हाण, प्रसन्न मालपेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह मोठय़ा संख्येने आघाडीच्या मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्ष निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे गटनेते संजय ओगले यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हिप बजावला होता. त्यामध्ये त्यांनी आघाडीच्या उमेदवार मीना मालपेकर यांना मतदान करण्याचे सूचित केले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा खडपे यांनी मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवार मालपेकर यांना मतदान करण्याऐवजी स्वत:ला मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीचा व्हिप फोल ठरला आहे. बंडखोरी करणाऱ्या खडपे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून कोणती कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2015 रोजी प्रकाशित
राजापूर नगराध्यक्षपदी मीना मालपेकर
या निवडणुकीमध्ये चमत्कार होण्याची राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा मात्र फोल ठरली.
Written by रत्नाकर पवार

First published on: 22-11-2015 at 06:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meena malpekar elect as president