‘‘घर आणि पोलीस दलातील नोकरी हे दोन्ही तुम्ही कसे सांभाळता, हा प्रश्न मला सेवेत आल्यापासून विचारला जातोय. करिअर करणाऱ्या सर्वच महिलांना असा प्रश्न विचारला जातो, पण तो पुरुषांना कधीच कुणी का विचारत नाही?’’ असा स्पष्ट सवाल राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी ‘लोकसत्ता- व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात केला आणि जमलेल्या शेकडो युवतींना आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची ऊर्जा दिली.
पुण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमाला युवती व युवकांनी अभूतपूर्व गर्दी केली. या प्रचंड गर्दीमुळे खुच्र्याबरोबरच व्यासपीठ, सभागृहातील येण्याजाण्याचा मार्ग आणि व्यासपीठापुढील मोठय़ा जागेत सर्वानीच दाटीवाटीने बसून हा कार्यक्रम ऐकला. स्पष्टवक्ता अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना अनेक निर्णयांमुळे लोकप्रिय झालेल्या श्रीमती बोरवणकर यांना ऐकण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्या बोलू लागताच त्यांच्या अनेक वक्तव्यांवर व परखड भाष्यावर युवती-युवकांनी प्रचंड टाळ्यांसह प्रतिसाद दिला.
‘‘घरातील महिला आणि पुरुष यांनी एकमेकांना मदत केली, तर नोकरी सांभाळून घर-मुले सांभाळणे अवघड नसते. पोलीस खात्यातील महिला कुणी वेगळ्या असतात असे नाही. सगळी नाती सांभाळून आपल्या कामातही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची क्षमता मुळातच महिलांच्यात असते,’’ असे बोरवणकर म्हणाल्या.
आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी आईवडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाविषयी बोरवणकर भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘‘माझे वडील पंजाबच्या पोलीस खात्यात होते. सुरुवातीपासूनच मी धाडसी होते असे नाही, पण मला पोलिसी गणवेशाचे आकर्षण नक्कीच होते. मी घोडेस्वारी करत असे, व्हेस्पा आणि लँब्रेटासारख्या स्कूटर चालवत असे. माझ्या भावाला हे पसंत नव्हते. तो आईवडिलांना म्हणे, ‘तुम्ही या स्कूटर हिच्या हुंडय़ात देऊन टाका. मी त्या वापरणार नाही.’ खरंच त्याने या दोन गाडय़ांना हातही लावला नाही. त्या वेळी आईवडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण तरीसुद्धा वडिलांना माझे पोलीस दलात जाणे आवडले नव्हते. आजच्या काळात आईवडील आपल्या मुलींना अधिक प्रोत्साहन देऊ लागले आहेत हे पाहून बरे वाटते.’’
मुली शारीरिकदृष्टय़ा कमकुवत असल्याचे नेहमी बोलले जाते. पण हा समज बिनबुडाचा असल्याचे सांगत बोरवणकर म्हणाल्या, ‘‘माझी पोलीस दलात निवड झाली तेव्हा माझ्या बॅचमधील मी एकमेव महिला होते. बॅचमधले ६८ पुरुष मला नोकरी विसरून घरी परत जाण्याचा सल्ला देत. रायफल शूटिंगमध्ये मी अव्वल होते. माझ्या कामगिरीवर विश्वास न बसून माझी पुन्हा परीक्षा घ्यावी असाही आग्रह धरला जाई. पण महिलांना बळकट आणि स्थिर हातांची देणगीच असते. त्या स्वभावत:च कष्टाळू, प्रामाणिक असतात. पुरुषांनी हे कबूल करायला हवे. आपल्या निर्णयांबद्दल इतरांना काय वाटते याचा आपण महिला फार विचार करत बसतो हेच चुकते. आपल्याला आपल्या आयुष्याकडून काय हवे आहे हेच महत्त्वाचे असते.’’
..हा प्रश्न महिलांनाच का?
‘‘घर आणि पोलीस दलातील नोकरी हे दोन्ही तुम्ही कसे सांभाळता, हा प्रश्न मला सेवेत आल्यापासून विचारला जातोय. करिअर करणाऱ्या सर्वच महिलांना असा प्रश्न विचारला जातो,
आणखी वाचा
First published on: 21-11-2013 at 02:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meera borwankar speak on women problem in loksatta viva lounge