पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांना अधिकच्या सुविधा देण्यात येणार आहे. तसेच गर्दीचे सूक्ष्म व स्वच्छतेचे नियोजन करावे. तसेच यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबधित विभागाने घ्यावी अशा, सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या. १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी आहे.
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कार्यकारी अभियंता अमित निंबकर, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा…Devendra Fadnavis : “शेतकऱ्यांना ३६५ दिवस मोफत वीज मिळणार”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली योजना
यावेळी बोलताना प्रांताधिकारी इथापे म्हणाले, यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेबाबत नगर पालिका व मंदिर प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणीपुरवठा करावा, वाळवंटातील तसेच शहरातील अतिक्रमणे तत्काळ काढावीत. वाळवंटात पुरेशा प्रकाश राहील याबाबत नियोजन करावे, धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. अनधिकृत फलक काढावेत.
नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी. कार्तिकी यात्रा कालावधीत मंदिर समितीने जादाचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. मंदिरात तसेच मंदिराभोवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडीट व स्काय वॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. तसेच कार्तिक यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असल्याने पशुसंवर्धन विभागाने पशुवैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच संबंधित विभागाने जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अन्न व औषध प्रशासनाने शहर व परिसरातील खाद्य पदार्थाच्या दुकानांची तपासणी करावी. एस.टी महामंडळाने प्रवाशी वाहतुकीचे नियोजन करून बसस्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले म्हणाले, यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. नगरपालिकेने शहरातील पार्कीग ठिकाणची लेव्हलिंग करून झाडे-झुडपे काढावीत तसेच प्रकाश व्यवस्था करावी. मंदिर व मंदिर परिसरात फिरत्या विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांना त्रास होतो यासाठी जादा हॉकर्स पथकाची नेमणूक करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. श्रोत्री म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी सांगितले.