भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी संध्याकाळी मुंबईत त्यांनी भाजपाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. तसेच, महाराष्ट्र आणि मुंबई भाजपाच्या काही बैठकाही त्यांनी घेतल्या. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसू लागलं आहे. दरम्यान, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल (१७ मे) बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा झाली असल्याचीही माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. दरम्यान याप्रकरणी मंत्री उदय सामंत यानी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
“जे. पी नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपाचे नेते आहेत. त्यांच्यात जी चर्चा झाली ती महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने, निवडणुकांच्या दृष्टीने, कदाचित मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भात असेल. पण या तीन मोठ्या नेत्यांची चर्चा काय झाली हे मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर मी बोलणं उचित नाही”, असं उदय सामंत म्हणाले. ते टीव्ही नाईन मराठीशी बोलत होते.
हेही वाचा >> Karnataka New CM : कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांची निवड, शपथविधीची तारीखही ठरली; शिवकुमार यांचं काय?
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक संभाव्या तारखा जाहीर झाल्यानंतरही विस्तार होऊ शकला नाही. तसंच, शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलल्याने महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला जोर आला आहे.
हेही वाचा >> भाजपाच्या कार्यक्रमात जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीसांसमोरच बत्ती गुल; आशिष शेलारांनी अंधारातच केली भाषणाला सुरुवात!
नड्डांच्या कार्यक्रमात बत्तीगुल
जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काही कार्यक्रम पक्षाकडून आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नड्डांसह भाजपाच्या काही वरीष्ठ नेत्यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कांदिवलीत आयोजित करण्यात आलेल्या पन्ना प्रमुखांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार आदी वरीष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, नेत्यांची भाषणं चालू असतानाच सभागृहातली लाईट गेली आणि तारांबळ उडाली.