नगर शहरातील उड्डाणपुलाचा फेरप्रस्ताव करायचा, की त्यातील बीओटीचा भाग वगळून उड्डाणपूल पूर्ण करायचा, की पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत उड्डाणपूल करायचा याबाबत तसेच उड्डाणपुलाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात अर्थमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, रस्तेविकास महामंडळाचे मंत्री व आपण यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.
पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल राम शिंदे यांचा खा. दिलीप गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सत्कार केला. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. आ. शिवाजी कर्डिले, नगरसेवक सुवेंद्र गांधी तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी डॉ. रवींद्र साताळकर, शांतीभाई चंदे यांच्याशी शिंदे यांनी चर्चा केली.
बाह्य़वळण रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, हे रस्ते झाल्यावर शहरातील वाहतुकीवर ताण येणार नाही, तो तात्काळ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे, असे शिंदे म्हणाले.
शहरासाठी पोलीस आयुक्तालय करण्याचा प्रस्ताव पूर्वी सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. याकडे लक्ष वेधले असता, आपल्याला या विषयाची माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी आणखी ५० लाखाचा निधी व फर्निचरसाठी सुमारे २ कोटी ५० लाख रु, असे एकूण ३ कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्य़ातील राहुरी, शेवगाव, कर्जत, जामखेड येथे आणखी एक पोलीस ठाणे मंजुरीचे व अतिरिक्त पोलीस संख्याबळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकला पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे, त्यानंतर तीन वर्षांनी शिर्डी येथे होणारा साईबाबा शताब्दी महोत्सवामुळे शिर्डी संस्थानच्या सुरक्षेचा विशेष प्रस्ताव गृहसचिवांकडे सादर झाला आहे, त्यावर चर्चा करून लवकरच निर्णय होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा