लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळमधील गुंड प्रवृत्ती संपविल्याविना गप्प बसणार नाही असा इशारा रोहित पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी शनिवारी निषेध सभेत दिला, तर मतांसाठी जाती-जातींत वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली.

कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा माजी खासदार पाटील, खासगी सचिव खंडू होवाळे यांच्यासह अन्य चार ते पाच अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर होवाळे यांच्या तक्रारीनुसार मुल्ला, बाळासाहेब पाटील व दादासाहेब कोळेकर अशा तिघांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम

दरम्यान, मारहाणीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी निषेध मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर बाजार पटांगणातच निषेध सभा झाली. या निषेध सभेत रोहित पाटील, खा. विशाल पाटील यांनी माजी खासदार पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. काय करायचे ते लवकर करा, यापुढे कायद्यानेच गुंडगिरी मोडून काढू, असा इशारा दोघांनी दिला. या वेळी आमदार सुमन पाटील याही उपस्थित होत्या.

कालच्या प्रकाराबद्दल बोलताना माजी खासदार पाटील म्हणाले, की माझ्या सचिवाला झालेल्या मारहाणीबद्दल विचारणा करण्यासाठी मुल्ला यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी रोहित पाटील हे मंत्री होणार आहेत, यानंतर एकेकाला मारेन अशी भाषा वापरली गेली. समजूत घातल्यानंतर माफीही मागण्यात आली. मात्र, युवा नेत्यांच्या चिथावणीने पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे घाणेरडे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. जाती-जातींत तेढ निर्माण करून मते घेण्यासाठीचा हा उद्योग आहे, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-Manoj Jarange : “मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडाल तर…”, मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा

तक्रार मागे

कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात माझ्याविरुध्द दिलेली तक्रार गैरसमजातून केली असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले असून या माध्यमातून हीन राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज काढण्यात आलेला मोर्चा सहानुभूती मिळवण्यासाठी होता. यावेळी करण्यात आलेल्या टीकेला लवकरच सडेतोड उत्तर देईन. -माजी खासदार संजयकाका पाटील