२२ दिवसांच्या बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याला विळा तापवून चटके दिल्याची घटना चिखलदरा तालुक्याकील सिमोरी गावात ही घटना घडली आहे. भूमकाने म्हणजेच एका भोंदू बाबाने या २२ दिवसांच्या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातल्या २२ दिवसांच्या बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला त्याच्या घरातल्यांनी गावातील भोंदूबाबाकडे नेलं. ज्याने या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिले. या घटनेमुळे अतिदुर्गम अशा मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस पाहण्यास मिळाला.या चटक्यांमुळे २२ दिवसीय बाळाची प्रकृती बिघडली. त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावातून हातरु या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र त्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे आता बाळाला अमरावतीतल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकाने भोंदू बाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिले, बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होतो, त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
अंनिसचे हरिष केदार यांनी काय म्हटलं आहे?
सिमोरी गावातील बाळाच्या पोटावर ६५ वेळा चटके देण्यात आले आहेत. या प्रकाराला गावात डंभा असं म्हणतात. या अनिष्ट प्रथेविरोधात अंनिसने १०० गावांमध्ये आरोग्य विषयक कार्यक्रम राबवला होता. असे कार्यक्रम राबवण्याची आणखी राबवण्याची गरज आहे असं आम्ही शासनाला सांगितलं आहे. असं केदार यांनी म्हटलं आहे.
बाळाचे वडील काय म्हणाले?
बाळाला डंभा देण्यात आला कारण त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, असं मला कळलं. मी माझ्या कामांमध्ये होतो, बाळाला पोटावर चटके कुणी दिले मला माहीत नाही. भूमका वगैरे आला होता का ते मला माहीत नाही.
बालरोग तज्ज्ञांनी बाळाच्या प्रकृतीबाबत काय सांगितलं?
बाळ २२ दिवसांचं आहे. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. त्याची प्रकृती नाजूक आहे. बाळाला हृदयाचा त्रास आहे असं दिसतं आहे. आम्ही टूडी इको चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज पडल्यास हायर सेंटरला बाळाला न्यावं लागेल. पोटावर चटके दिले आहेत कारण त्यांना वाटलं की बाळाला पोटाचा काहीतरी त्रास आहे. मात्र बाळाचं हृदय कमकुवत आहे. वेळ पडल्यास बाळावर शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. बाळाचे चटके आणि त्याचे वण काही दिवसांत बरे होतील. पण बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे. वेळ पडल्यास नागपूरलाही बाळाला न्यावं लागेल असं बालरोग तज्ज्ञांनी सांगितलं आहे. सध्या बाळाची प्रकृती गंभीर आहे.