वाघाची शिकार करणे गुन्हा असतानाही मेळघाटातील जंगलात तिघाजणांनी एका वाघिणीची शिकार केल्याने अमरावती येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. याच प्रकरणातील अन्य तीन आरोपींना मात्र पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले, तर माफीचा साक्षीदार असलेला एक आरोपी फितूर झाल्याने त्याच्यावर नव्याने खटला दाखल करण्यात येणार आहे. वाघाच्या शिकार प्रकरणात वर्षांनुवष्रे निकाल रखडल्याचीच अधिक उदाहरणे आहेत. मात्र, या प्रकरणाचा निकाल अवघ्या वर्षभरात लागल्यामुळे वाघ शिकार प्रकरणातील इतर निकालही याच गतीने लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागातील ढाकणा रेंजमध्ये डिसेंबर २०१२मध्ये वाघिणीची शिकार करण्यात आली. मेळघाट वनविभागाला तीन महिन्यानंतर या शिकारीची कुणकुण लागली. मेळघाट आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील सिनबन आणि मोथाखेडा या गावातून मधुसिंग राठोड, चिंताराम राठोड, अनेश राठोड, सागरलाल पवार, नरविलाल पवार, विनोद पवार, मिश्रीलाल यांना अटक करण्यात आली. नागपूर आणि अमरावती वनविभागाच्या आरोपींच्या एकत्रित तपासादरम्यान वाघिणीच्या शिकारीची कबुली या सात आरोपींनी दिली.
दरम्यान, याच प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली. एकूण चौदा आरोपींवर तीन आरोपपत्र दाखल करण्यात आले. पहिल्या आरोपपत्रातील आरोपींनी वाघिणीची शिकार करून कातडी व हाडे हरयाणातील एका तस्करला एक लाख ६५ हजार रुपयांना विकल्याची कबुली दिली. त्यानंतर मधुसिंग राठोड, चिंताराम राठोड व विनोद पवार यांना ५ वर्षांंची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सागरलाल पवार, नरविलाल पवार व मिश्रीलाल यांना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील माफीचा साक्षीदार अनेश राठोड फितूर झाला.त्याच्यावर नियोजनबद्ध शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मेळघाट वाघ शिकारप्रकरणी दोषींना ५ वर्षांचा तुरुंगवास
वाघाची शिकार करणे गुन्हा असतानाही मेळघाटातील जंगलात तिघाजणांनी एका वाघिणीची शिकार केल्याने अमरावती येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावली.
आणखी वाचा
First published on: 19-06-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Melghat tiger hunting case convicted get 5 years of jail