विदर्भातील डझनावारी वन्यजीव शिकार प्रकरणाच्या खोलात शिरणारी कोणतीही ठोस प्रगती वन विभागाच्या चौकशी पथकांनी केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या १९ जून रोजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व) एस.एस. मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यीय चौकशी पथक नेमण्यात आले होते. यापैकी काही सदस्य सुटीवर गेले असून काहींनी येथून बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. समितीचे एक सदस्य पी.सी. विश्वास यांनी नुकताच कटनी येथे दौरा करून शिकाऱ्यांची विस्तृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापलीकडे चौकशीने फारशी मजल मारलेली नाही. त्यामुळे चौकशीच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकशीची सूत्रे आता सीआयडी किंवा सीबीआयकडे सोपविण्यावरही वन खात्यात विचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मेळघाटत अलीकडेच उघडकीस आलेल्या पाच वाघांच्या शिकार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच संशयित शिकाऱ्यांना दंडाधिकारी कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून एकाची रवानगी वन कोठडीत करण्यात आली आहे. मेळघाट, ताडोबात बहेलिया टोळ्यांनी शिरकाव केल्याने वन खाते हादरले असून देशातील सर्वोच्च व्याघ्र प्रकल्प असलेल्या ताडोबात मोठय़ा संख्येने दिसणाऱ्या वाघांचे जीवित धोक्यात आल्याने या टोळ्यांचा समूळ बीमोड करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी अटकेतील शिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस धागेदोरे अद्याप वन विभागाला मिळालेले नाहीत. मुंबई आणि नवी दिल्लीत बसून शिकारीची सूत्रे हलविणाऱ्या मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. अटकेतील शिकाऱ्यापैकी यार्लेन आणि बारसूल हे दोन आरोपी मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या वन विभागाने जबलपूर येथून ताब्यात घेऊन चौकशीसाठी नागपुरात आणले आहे. ‘कटनी गँग’ म्हणून कुख्यात असलेल्या बहेलिया टोळ्यांचा वाघांची शिकार करून त्यांचे कातडे आणि अवयव विकण्याचा पारंपरिक धंदा आता आंतरराष्ट्रीय तस्करीचे रुप घेऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर अटकेतील बहेलिया शिकाऱ्यांकडून प्रमुख सूत्रधारांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बुधवारी सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पाच आरोपींना दंडाधिकारी कोठडीत पाठविण्याचे आदेश देण्यात आले.
फक्त यार्लेन याला वन कोठडी मिळाली असल्याने त्याच्या मोबाईल क्रमांकाची विस्तृत माहिती मिळविली जात आहे. आतापर्यंत मिळवलेल्या ‘कॉल डिटेल्स’मध्ये यार्लेन हा मेळघाटात वाघाची शिकार करणाऱ्या मामरू आणि चिका याच्या संपर्कात होता, ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. एवढेच नव्हे तर त्याचा दिल्लीतील सर्जू नावाच्या वाघाच्या कातडय़ांची तस्करी करणाऱ्या दलालाशीही संपर्क होता, अशी माहिती मिळूनही वन विभागाचे हात त्याच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्जू फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणाची हाताळणी कठोरपणे न झाल्यास न्यायालयातून आरोपींना जामीन मिळेल आणि त्यांची पावले पुन्हा शिकारींच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे.
ही टोळी संघटित असून त्याचे आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी असलेले धागेदोरे उलगडण्यासाठी त्यांना वन कोठडीत मिळणे गरजेचे होते. अटकेतील शिकारी वस्तुस्थिती लपवत असून चौकशी पथकाला जुमानात नसल्याने प्रगती खुंटली आहे.
प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर.बी. राजा यांनी शिरी, मामरू, चिका, बारसूल आणि जियालाल बावनकर यांना दंडाधिकारी कोठडी दिली आहे.
जियालालवर शिकारीसाठी लोखंडी सापळा बनविल्याचा आरोप आहे. शिरी, चिका आणि यार्लेन हे कुख्यात शिकारी आहेत.
मेळघाट वाघ शिकार प्रकरणी चौकशी ठप्प
विदर्भातील डझनावारी वन्यजीव शिकार प्रकरणाच्या खोलात शिरणारी कोणतीही ठोस प्रगती वन विभागाच्या चौकशी पथकांनी केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या १९ जून रोजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व) एस.एस. मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यीय चौकशी पथक नेमण्यात आले होते.
आणखी वाचा
First published on: 05-07-2013 at 02:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Melghat tiger hunting case struck down