विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. होती.
नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावरुन याआधीही विधासभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपा नेत्यांनीही हे बरोबर नसल्याचे म्हटले होते. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आक्रमकपणे याबाबत विधिमंडळ आणि आवारामध्ये सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी अशी भूमिका घेतली. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या बोलत दालनात सभासदांचे वर्तन याबाबत बैठक घेण्यात आली. सभासद त्यांनतर वर्तनाबाबत एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरुनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली.
“नितेश राणेंना कायमचे निलंबित करा”; आदित्य ठाकरेंसंदर्भातील वक्तव्यानंतर भास्कर जाधव आक्रमक
“आचारसंहितेचे पालन करणे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. राज्यातला प्रत्येक जण विधीमंडळातल्या प्रत्येकाच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. या सभागृहामध्ये काही जण ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामध्ये काम करुन आलेले असतात, काही नगरपालिका, नगरपंचायत याचा अनुभव असलेले येतात. तर काही जण एकदम नवी कोरी पाटी असते, त्यांना कसलाही अनभुव नसतो. पक्षाचा पाठिंबा असतो म्हणून निवडूण येतात. ही आजपर्यंतची परंपरा आहे. विधिमंडळाचा सदस्या विधिमंडळाता आणि आवारात कसा वागतो, सार्वजनिक जीवनात तो कशा पद्धतीने वावरतो यातून केवळ त्या सदस्याचाच नाही तर सभागृहाची आणि विधिमंडळाची प्रतिमा ठरते आणि याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे,” असे अजित पवार यांनी म्हटले.
“या सभागृहातल्या सदस्यांना माझी विनंती आहे गेल्या काही वर्षामध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या मान सन्मानाला नक्कीच धक्का बसला आहे. ही प्रतिमा आणखीन ढासळू नये. तिला उंचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वांनी सभागृहातल्या विधिमंडळातल्या आवारात सार्वजनिक जीवनातल्या स्वतःच्या वर्तनाबद्दल अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
“आदर्श वर्तन आणि आचारसंहितेचे पालन होण्याबाबत सगळ्यांनी चिंता व्यक्त केली. पक्ष बाजूला ठेवून यावर चर्चा करण्यात आली. त्या संदर्भात सर्व सदस्यांना जाणीव करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही ३० वर्षापूर्वी आलो त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी लाईव्ह प्रक्षेपण होत नव्हतं. विधिमंडळ आवारात असलेल्या माध्यमांच्या असेलेल्या कक्षातून आता प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे सदस्यांचे वर्तन विधिमंडळाला शोभेल तसेच इतर कोणाचा अपमान,” अवमान होणार नाही असे ठेवले पाहिजे.
“एका गोष्टीची मला खंत आहे. माझी मते मी स्पष्टपणे मांडतो मी कधी त्यामध्ये पक्षीय राजकारण आणत नाही. पण संससदीय सभ्याचार आणि शिष्टाचार हे पुस्तक सर्वांना वाचले पाहिजे. या सभागृहामध्ये निवडूण येताना लाखों मतदार तुमच्याकडे बघून मतदार करतात त्यातून तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. माझी आग्रहाची विनंती आहे. विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणे हा सभागृह सदस्यांचा आणि मतदारांचा विश्वासघात केल्या सारखे आहे. आपला माणूस तिथे जाऊन असे आवाज काढतो, टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल. त्यामुळे सर्वांनीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.