मोठा गाजावाजा करत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड बालेकिल्ल्यातच अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती पुढे आली आहे. मुळात पक्षाचे नगरसेवक सदस्यनोंदणीसाठी उत्साही नव्हते. पत्र देऊन, दूरध्वनी करून तसेच सतत एसएमएस पाठवूनही दाद मिळत नव्हती; अशा परिस्थितीत अजितदादांनी धाडलेल्या खरमरीत पत्रानंतर सूत्रे हलली. मात्र, तरीही नोंदणीचा प्रवास रडतखडतच सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त १० जून २०१२ ला राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना झाली. तालुका, नगरपालिका व महापालिका स्तरावर संघटना बांधणीचे काम हाती घेत राष्ट्रवादीकडून सदस्यनोंदणीचे गणित मांडण्यात आले. संघटनेची रचना व निवड प्रक्रियेसाठी काही निकषही ठरवून १८ ते ३० वयोगटातील युवतींची नावे, पत्ता, शिक्षण, दूरध्वनी, ई मेल, जन्मतारीख आदी माहितीची नोंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सुळे यांच्या मेळाव्यांना युवतींकडून जोरदार प्रतिसाद मिळत असताना अपेक्षित नोंदणी मात्र होत नव्हती, असे चित्र होते. तेव्हा अजितदादांनी राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, सेलचे पदाधिकारी, महापौर, नगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष आदींना पत्र लिहून संघटना बांधणीचे काम अतिशय संथपणे सुरू असल्याची नाराजी व्यक्त केली होती. नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१२ पर्यंतची मुदत होती. मात्र, त्यात अपेक्षित काम न झाल्याने ३१ जानेवारी २०१३ पर्यंत मुदत वाढवल्याचे सांगत नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करण्याची तंबी दिली होती.
राष्ट्रवादीच्या पिंपरी बालेकिल्ल्यात सुरूवातीला फारसा उत्साह कुणी दाखवला नव्हता. प्रत्येक नगरसेवकाकडून ८-१० युवतींची नावे मागवण्यात आली, मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ होत होती. त्यामुळे पत्र देऊन नोंदणीची आठवण करून देण्यात आली. पक्षकार्यालयातून वारंवार फोन तसेच एसएमएसही करण्यात आले. मात्र, तरीही नावे मिळत नसल्याने शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नावनोंदणीसाठी १५ फेब्रुवारीची अंतिम मुदत देत शेवटचे स्मरणपत्र सर्वाना पाठवले, त्यास अजितदादांचे ते पत्रही जोडले. निर्धारित मुदतीत सदस्यनोंदणीसाठी नावे न दिल्यास आपण उत्साही नाही व आपली भूमिका नकारात्मक आहे, असा अहवाल अजितदादा व प्रदेशाध्यक्षांना पाठवू, अशी भूमिका त्यांनी घेतली. अजितदादांचे ‘नाराजी’ पत्र वाचल्यानंतर पक्षात हालचाली होऊ लागल्या. मात्र, तरीही निम्म्यापर्यंत नगरसेवकांकडून युवतींची जवळपास ५०० नावांची नोंदणी होऊ शकली. अजूनही अनेक नगरसेवकांच्या नावांची प्रतीक्षा सुरूच असल्याचे सांगण्यात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा