– डाॅ. श्रीरंग भावे (गायक)

मी पाचवीत शिकत होतो तेव्हाची गोष्ट. आंतरशालेय मराठी सुगम संगीत स्पर्धेत भाग घेतला आणि त्यासाठी ‘दिस नकळत जाई’ हे गाणं बसवायला घेतलं. गाणं अनेकदा ऐकून बसवलं आणि म्हटलं देखील! संगीतकार गायक मिलिंद इंगळे यांचं सुरेख संगीत, कवी सौमित्र यांचे शब्द आणि अरूण पौडवाल यांचं संगीत संयोजन लाभलेल्या या गीताचे गायक कोण, हे सुरूवातीला माहित नव्हतं. पण तेव्हाच हे गीत मनात घर करून बसलं होतं. कारण म्हणजे, लक्षात राहिलेला तो तलम, मखमली आवाज. आईने सांगितलं – ‘शुक्रतारा’ हे गाणं ज्यांनी म्हटलंय त्या अरुण दातेंचा आवाज आहे हा. मला ‘शुक्रतारा’ हे गाणं तेव्हाही माहित होतं कारण माझी आई सौ. सरिता भावे हिने दाते काकांसोबत 1997-98 दरम्यान ‘शुक्रतारा’ चे महाराष्ट्र-गोवा-मध्यप्रदेश असे 55 कार्यक्रम केले होते. यानिमित्त असंख्य आठवणींच्या फुलांचा एक सुंदर गुच्छ आईने माझ्यासमोर गाणं बसवून घेताना नकळत ठेवला आणि त्या सा-याचा मोहक दरवळ अजूनही तेवढाच ताजा आहे. त्यानिमित्त एका असामान्य प्रतिभावान आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाची ओळख होत गेली.

आई आणि दाते काका दौरे करीत असताना प्रवासात कायम हिंदीमध्ये बोलायचे. वादकांना प्रश्न पडे – ‘हे असं का?’ तर अरू काका इंदूरचे आणि आई मध्यप्रदेशात खांडव्यात राहिलेली. अरु काकांना उर्दू भाषा आणि गझल याविषयी अपार प्रेम होतं. शिवाय दाते काका Textile Maintenance Engineer होते आणि माझे आजोबा – आईचे वडिल, तबलावादक श्री. रघुनाथ आगाशे हे देखिल ‘निमाड टेक्स्टाईल्स्’मध्ये Maintenance Engineer असल्याने Site Visit निमित्त आजोबा व दाते काकांची भेट झाली होती. त्यामुळे परिचय होताच!

2010 साली आईने स्वरचित संगीतबद्ध केलेल्या हिंदी-उर्दू गझलांच्या ‘मै हू गझल’ या अल्बमचं प्रकाशन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात खास दाते काकांच्या हस्ते केलं होतं. तेव्हा त्या तेजःपुंज लखलखत्या ता-याचं अगदी जवळून दर्शन घडलं. यापूर्वी ते आमच्या बोरिवलीच्या घरी आले होते – उंचपुरं, देखणं, गोरंपान, घारे डोळे असलेलं रूबाबदार व्यक्तिमत्व…यातूनच त्यांचं भावविश्व रसिकांपर्यंत पोहोचत असावं अशी खात्री तेव्हाच झाली.

अरुकाकांचे सुपुत्र अतुल दाते, आम्हा सगळ्यांचा अतुल दादा याच्याशी जवळून संपर्क आला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांच्या ‘महाकवी सावरकर’ या कार्यक्रमात. या कार्यक्रमाची संहिता, लेखन, निरूपण प्रसिद्ध व्याख्यात्या सौ.धनश्री लेले यांनी केलं होतं आणि त्यात माझा गायक म्हणून सहभाग होता. सावरकरांसारखा धगधगता विषय असो, वा अभंग-लावणी, नाट्यसंगीत तसेच शुक्रतारा सारख्या संहिता – या सगळ्या कार्यक्रमांचं समर्थपणे निर्मिती आणि आयोजन करताना मी दादाला पाहत आलोय. तो गमतीत नेहमीच म्हणतो, की ‘मी गायलो नाही तेच बरं केलं’ पण घरातच असलेल्या लखलखत्या स्वरता-याचे संस्कार मनात खोलवर झाले होते हे सांगणे नलगे. सतत नवीन संकल्पना राबवणे, बाबांप्रमाणेच असलेली Hospitality, मंजू ताईची प्रेमळ साथ आणि दादाचा अखंड उत्साह आणि आम्हा कलाकारांना अगदी परिवारातला समजून नेहमीच दिलेली कौटुंबिक treatment या दुर्मिळ वाटणा-या गोष्टी मी इथे सढळ अनुभवल्या. बाबांचा समृद्ध असा वारसा अतुल दादा सांभाळतोय आणि पुढे नेतोय हे पाहून अभिमान वाटतो.

त्यानंतर अतुलदादा ने निर्मिलेल्या ‘शुक्रतारा मंदवारा’ या कार्यक्रमात अरुण दाते व मंगेश पाडगावकर यांच्यासोबत त्यांचीच गाणी म्हणण्याचं भाग्य लाभलं! दोघांनीही हुरूप वाढवला, आशीर्वाद दिले व कायम प्रोत्साहन देत राहिले. यानिमित्त दाते काकांच्या पुण्यातल्या घरी तालमी करण्याचा व राहण्याचा योग आला. आई कार्यक्रमांच्या आठवणीत कायम सांगायची – लोकांना कायम तोच आनंद मिळावा यासाठी कार्यक्रमापूर्वी काका स्वतःच्याच गाण्यांची ओरिजनल टेप ऐकून रिहर्सल करायचे’. त्यांचे Dedication, Perseverance, Hardwork आणि चिकाटी हे गुण आमच्या पिढीला घेण्यासारखे आहेत. यास्तव दाते काकांचा स्वभाव मिश्किल, निरागस होता आणि ते वातावरण सतत हलकंफुलकं, आनंदित ठेवायचे.

दाते काका गाण्याइतकेच खाण्याचे शौकीन होते. त्यांनी मला स्वतः हापूस आंबा चिरून दिला होता. Microwave मध्ये पेढा गरम करून खाल्ला की त्याचा स्वाद काही औरच लागतो, असं ते नेहमी सांगत. ब्रेड स्लाईस टोस्ट करून त्याला भरपूर बटर लावून खाणे हे त्यांना खूप आवडायचे.

व्यावसायिक रंगमंचावर एक ‘रूतबा’ घेऊन वावरणे, लोकाभिमुख संवाद, Punctuality, Time Management, Social Awareness, मित्र-आप्तमंडळींशी आपुलकी, घरोबा, या आणि असंख्य बारीक गोष्टी केवळ Observation मधून शिकायला मिळाल्या! म्हणूनच अरुण दाते म्हणजे एक राॅयल माणूस असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

गेल्या 4-5 वर्षात प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास तसेच रंगमंचीय गायन करणं अरु काकांनी कमी केलं होतं. पण आपलीच गाणी पुन्हा ऐकताना त्यांच्या डोळ्यातली चमक आणि आनंद बघत रहावा असा असायचा. अतुल दादाने दाते काका आता गाणार नाहीत पण तरिही या गाण्यांची स्वरगंगा वाहत रहावी याकरता “नवा शुक्रतारा” ची आखणी केली. ज्यात मंदार आपटे व माझा प्रामुख्यानं सहभाग होता. दातेकाकांना आमचा आवाज व गाणी आवडायची व त्यांच्याच अनुमतीनुसार आम्ही ही गीतांची स्वरगंगा वाहणार असे निश्चित झाले. देवाकडे अजून काय मागावे? परमभाग्याचे क्षण माझ्या झोळीत तेव्हापासून पडत राहिले व त्यास अमृतसंचयाचे स्वरूप लाभले आहे.

22ऑगस्ट 2017 ही माझी दाते काकांशी झालेली शेवटची भेट. तब्येत बरी नसूनही ते उत्साही होते. ‘सखी शेजारिणी’ हे मला वैयक्तिक आवडणा-या वा.रा.कांत आणि वसंत पवार यांच्या गीताला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अरू काकांसमवेत Promo Videos करायचे होते. शूट झालं आणि नंतर माझा हट्ट म्हणून मी त्यांना शंकर वैद्य व हृदयनाथांचं ‘आज हृदय मम विशाल झाले’ हे गाणं म्हणून दाखवलं. गाण्याच्या शब्दांचा पुरेपूर अनुभव मी तेव्हा घेतला!

6मे 2018 ची पहाट अवघ्या रसिकमनांना हेलावून टाकणारी होती. दाते काका आता नाहीत हा विचार मनाला सुन्न करणारा आणि चटका लावणारा होता. पण ‘एखाद्या Satinच्या तलम कापडावर पांढरे शुभ्र टप्पोरे मोती अलगद सोडावे’ असा रेशमी आवाज एका अढळ शुक्रता-याप्रमाणे प्रकाशमान राहील हीच इच्छा बहुतेकांच्या मनात होती.

वर म्हटल्यानुसार त्यांचं मी गायलेलं पहिलं गाणं – दिस नकळत जाई हे आणि त्यांची सगळीच गाणी आपल्याला आनंद देत राहतील…अरुण म्हणजे सूर्याचा सारथी आणि भावसंगीतातील सूर्यकिरणांचं सारथ्य करत या अरुणाने रसिकांना व भावसंगीतविश्वाला अक्षय संजीवनी दिली, समृद्ध केलं व भावसंगीत लखलखतं ठेवलं. यापुढे कायमच – ‘क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही’ ही भावना माझ्या मनात असेल!
अरु काका तुम्हाला माझा सलाम!!