छत्रपती शिवाजी महाराजांची लाडकी कन्या सखुबाई आणि जावई महादजी नाईक-निंबाळकर यांच्या माळशिरस येथील समाधीस्थळाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. उपेक्षेचे जिणे जगणाऱ्या या स्मारकांना अनेक ठिकाणी चिरा गेल्या आहेत. त्याचे दगड विटा निखळले आहेत. भोवतीने काटेरी झुडपांचे जंगल वाढले आहे. बेवारस झालेल्या या वास्तूत सध्या पत्त्यांचे डाव आणि दारुडय़ांचे अड्डे भरत आहेत.
छत्रपती शिवरायांची कन्या सखुबाई व जावई महादजी नाईक-निंबाळकर यांची स्मारके माळशिरस येथे अस्तित्वात आहेत. त्यांच्या निधनानंतर तीनशे वर्षांपूर्वीच ही स्मारके बांधण्यात आली. एखाद्या मंदिराप्रमाणे बांधलेल्या या स्मारकास नक्षीकाम केलेले शिखरही आहे. पंढरपुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी या दोन्ही समाधीस्थळांचा शोध लावला असून त्याबाबतचा तपशील त्यांनी लिहिलेल्या ‘सोलापूर जिल्ह्य़ाचा इतिहास’ (मराठा कालखंड) या ग्रंथात दिला आहे. त्यांच्या या संशोधनानंतर या स्मारकांची दुरवस्थेबद्दल मोठी ओरड झाली. यावर शासनाने २०११-१२ साली या दोन्ही स्मारकांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत २२ नोव्हेंबर २०११ रोजी ८० लाख रुपये खर्चाच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला. या प्रस्तावात दोन्ही समाधीस्थळांच्या दुरुस्तीसह संरक्षक भिंत बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे तसेच परिसरात यात्री निवास उभारणे या कामांचा समावेश होता. परंतु जिल्हा नियोजन समितीकडे दाखल झालेल्या या प्रस्तावावर आजतागायत कसलीही कार्यवाही झाली नाही. प्रस्तावाची फाईल नियोजन समितीकडेच धूळ खात पडून आहे.
शिवछत्रपतींचे नाव घेऊन राज्याचा कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या लेखी शिवछत्रपतींच्या कन्या व जावयाचे समाधीस्थळ अद्यापि उपेक्षितच आहे. गेल्या काही दिवसांपसून तर आता या इमारतीला तडे जाऊ लागले आहेत. दगडाचे चिरे नाहिसे झाले आहेत. माजलेल्या काटेरी बाभळींनी या वास्तूचा गळा आवळला आहे. भटकी कुत्री, पत्ते खेळणाऱ्यांचे अड्डे असे या स्मारकाचे सध्याचे वर्तमान आहे. बेवारस झालेली ही वास्तू रात्री-अपरात्री दारुडय़ांचे आश्रयस्थान बनली आहे. छत्रपती शिवरायांची मुलगी आणि जावयांच्या स्मारकाची ही दुरवस्था पाहून अनेक अभ्यासकांची मने हेलावून जात आहेत.
ऐतिहासिक वास्तू, स्मारके यांचे जतन करणे ही काळाची गरज असताना आम्ही दररोज नवनवे पुतळे आणि स्मारके उभी करत चाललो आहोत, हा आमच्या गौरवशाली इतिहासाचा आणि इतिहासपुरुषांचा अवमान आहे. या स्मारकांचे जतन करत तिथे इतिहास मांडला तर नवी पिढी आमच्या या भूतकाळाशी जोडली जाईल.
इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा