भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. यावेळी सोलापूरकरांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लतादीदींचा नाट्यसंगीत आणि शास्त्रीय गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम वयाच्या नवव्या वर्षी सोलापुरात झाला होता, याचा समस्त सोलापूरकरांना अभिमान आहे. सरस्वती चौकाजवळील जीवनतारा बंगल्याच्या मोकळ्या जागेतील नूतन संगीत नाट्यगृहात ९ सप्टेंबर १९३८ रोजी झालेल्या शास्त्रीय संगीत जलसामध्ये लतादीदींनी खंबावती रागातील चीज व दोन नाट्यगीते सादर करून आपल्या गानकलेचा ठसा उमटवला होता. त्यानंतर लतादिदींच्या गायन कलेची कारकिर्द १९४२ साली सुरु झाली होती. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी लतादिदींनी पार्श्वगायन केले होते.

या कार्यक्रमाचे वर्णन करताना मूळचे सोलापूरचे प्रसिद्ध बासरीवादक कै. अरविंद गजेंद्रगडकर यांनी एका लेखात, “एके रात्री मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची रागदारीची आणि नाट्यसंगीताची मैफल कुणीतरी सोलापुरात ठरवली होती. गाण्याची साथ लता मंगेशकर असे लिहिले होते. तिकीट होते फक्त आठ आणे. मास्टर दीनानाथ यांना बघण्यासाठी अनेकजण आले होते. पडदा उघडला. दीनानाथ यांच्या मागे काटकोळी पण तेजस्वी डोळ्यांची लता तंबोरा घेऊन बसली होती. या कार्यक्रमात दीनानाथ यांचा आवाज लागत नव्हता. ते विलक्षण थकलेले दिसत होते. त्यामुळे त्यांचा आवाज नीट लागत नव्हता. एकदोन रागातल्या चिजा व एक नाट्यपद त्यांनी कसेबसे सादर केले. प्रयत्न करूनही त्यांचा आवाज वर जाईना. ते बाजूला झाले. लताला पुढे यायची खूण केली आणि म्हणाले, आता हिचे गाणे ऐका. लता सरसावून बसली आणि तिने पहिलाच स्वर असा लावला की ते सगळे दरिद्री मरगळलेले सभागृह सोनेरी चैतन्याने झगमगू लागले. दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आवाज म्हणजे काय असतो, याचा सर्वाना घडलेला तो साक्षात्कार होता. थरारून टाकणारा क्षणात दिव्यत्वाचे दर्शन घडवणारा सुरेल, सर्वांगसुंदर, सोनेरी साक्षात्कार! मघाशी एवढीशी दिसणारी चिमुरडी लता आता आभाळाहून मोठी दिसत होती. तो दिवस, स्वरानुभव सर्वांच्या अंतकरणावर कायमचा कोरला गेला,” असे म्हटले होते.

आपल्या आयुष्यातील पहिल्या नाट्यसंगीत व शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सोलापुरात झाल्याच्या ८३ वर्षापूर्वीच्या आठवणींना लतादीदींनी गेल्या वर्षी ९ सप्टेंबर २०२१ रोजी ट्विटच्या माध्यमातून त्यावेळच्या छायाचित्रासह उजाळा दिला होता.

१९८४ साली वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारण्यासाठी आर्थिक मदतीकरिता आयोजित गायन कार्यक्रमासाठी लतादीदी सोलापुरात आल्या होत्या. सोलापूर महानगरपालिकेतर्फे १९ फेब्रुवारी १९९४ रोजी इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, मंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन महापौर मनोहर सपाटे यांच्या उपस्थितीत फेटा बांधून, शाल व पुष्पहार घालून तसेच चांदीच्या करंडकात मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

‘मोगरा फुलला, मोगरा फुलला’ या गाण्याचे कडवं सुरेल आवाजात गाऊन लतादीदींनी या कार्यक्रमाचा समारोप केला होता. मानपत्राच्या निमित्ताने लतादीदी आपल्या भगिनींसह सोलापुरात तीन दिवस मुक्कामाला होत्या. त्याचवेळी त्यांनी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासही त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी अन्नछत्रातील भाविकांसाठी चाललेल्या महाप्रसाद सेवेने भारावून जात लतादीदी थेट मुदपाकखान्यात गेल्या आणि स्वतः पोळ्या लाटून सेवा केली होती. तेव्हापासून अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले यांच्याशी लतादीदींचा ऋणानुबंध सुरू झाला होता.

मुंबईत जन्मेंजयराजे भोसले यांना ‘प्रभूकुंज’वर सन्मानाने आमंत्रित करून लतादीदींनी स्वतःच्या मर्सिडिज बेंझ आणि शेव्हरलेट क्रूझ या दोन आलिशान मोटारी त्यांना भेट दिल्या होत्या. २०१९ मध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आयोजित धर्मसंकीर्तन सोहळ्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांच्या संगीत गायनाच्या मैफलीत मुंबईहून लतादीदींनी मोबाईलच्या माध्यमातून सुमारे १५ मिनिटे थेट संवाद साधला होता. जन्मेंजयराजे भोसले यांच्या सेवाकार्याची त्यांनी प्रशंसा करीत अक्कलकोटला येण्याचेही मान्य केले होते. मीनाताई खडीकर यांनी लिहिलेल्या ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकात जन्मेंजयराजे भोसले यांचा उल्लेख ‘घरातली माणसं’ असा केला आहे.

लतादीदींनी सोलापुरातील चित्रकार पोरेबंधुंच्या कलेला आपुलकीने दाद दिली होती. लतादीदींच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पोरे बंधुंनी लतादीदींचे सुंदर चित्र साकारून त्यांना पाठविले होते. तेव्हा लतादीदींनी स्वहस्ताक्षरातील आभाराचे पत्र पाठविताना त्या चित्राची छबी चिकटावून पाठवली होती. नंतर सोलापुरात आल्यानंतर लतादीदींनी पोरे बंधुंच्या स्टुडिओला आवर्जून भेट देऊन त्यांच्या कलेचे कौतुक केले होते. हा आमच्या जीवनातील अत्यंत अनमोल ठेवा आम्ही जिवापाड जपून ठेवल्याचे रविकिरण पोरे सांगतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memories evoked by solapurkar of lata mangeshkar first program abn