ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर वेंगुर्लेचे सुपुत्र असले तरी सावंतवाडी विठ्ठल मंदिरशेजारी त्यांच्या कुटुंबीयांची प्रॉपर्टी होती. ही मिळकत कालांतराने विक्री करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले, पण त्यांचा साहित्य सहवास सावंतवाडी शहराला लाभला आहे.
सावंतवाडी विठ्ठल मंदिरशेजारी त्यांच्या काकांची प्रॉपर्टी होती. वेंगुर्लेत जन्मलेले कवी मंगेश पाडगांवकर त्यामुळे सावंतवाडीत येत असत. काकांच्या निधनानंतर सुमारे २५ वर्षांपूर्वी स्वत: मंगेश पाडगांवकर सावंतवाडीत आले. त्यांनी प्रॉपर्टीची छायाचित्रेही टिपली होती, अशी एक आठवण ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट यांनी बोलताना सांगितली.
‘वैनतेय’कार कै. मे. द. शिरोडकर यांच्या प्रेसमध्ये त्या काळी मंगेश पाडगांवकर यायचे. त्यावेळी साहित्यिक कै. वि. स. खांडेकर, मंगेश पाडगांवकर व कै. शिरोडकर यांच्या गप्पा रंगायच्या. त्याशिवाय आरवलीचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कै. जयवंत दळवी यांचे खास मित्र असल्याने आरवलीत रहायचे. या आठवणी जुन्या असल्या तरी मंगेश पाडगांवकर यांच्यामुळे त्या ताज्या बनल्या आहेत.
सावंतवाडीच्या मंगेश पाडगांवकर यांच्या कुटुंबीयांच्या प्रॉपर्टीचा सांभाळ त्यांचे काका करायचे. पण काकांच्या निधनानंतर या मिळकतीत भाडोत्री राहत होते. हल्लीच्या काळात ही प्रॉपर्टी बिल्डर्सने खरेदी केली आहे, असे सांगण्यात आले.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांचे जन्मस्थान उभादांडा वेंगुर्लेच्या आठवणीसोबत सावंतवाडी आणि आरवली येथील साहित्य सहवास लाभला आहे. ‘वैनतेय’मध्ये त्याकाळी वि. स. खांडेकर लिखाण करायचे. त्याशिवाय वैनतेयकार मे. द. शिरोडकर, कै. खांडेकर व कै. जयवंत दळवी यांच्या सहवासातील मंगेश पाडगांवकरांच्या आठवणी जुन्या जाणत्यांकडूनही ऐकायला मिळाल्या.