पत्रकार विमानाने आणि साहित्यिक मात्र रेल्वेने, या संयोजकांच्या धोरणामुळे राज्यातील अनेक नामवंत साहित्यिक घुमानला गेलेच नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पत्रकारांच्या हवाई प्रवासासाठी तत्परतेने प्रायोजक शोधणाऱ्या संयोजकांनी हीच तडफ साहित्यिकांसाठी का दाखवली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 साहित्य संमेलनासाठी राज्यातून अनेक साहित्यिक व सारस्वतप्रेमी गेले आहेत. या संमेलनाला जाता यावे vv13म्हणून संयोजकांनी दोन विशेष रेल्वे गाडय़ांची व्यवस्था केली होती. तरीही ४० तासांच्या दगदगीच्या प्रवासाच्या कारणाने अनेक साहित्यिकांनी घुमानला जाण्याचे टाळले. वयाने ज्येष्ठ असलेल्या साहित्यिकांना लांबचा प्रवास झेपणार नाही, हे आधीच लक्षात येऊनसुद्धा या साहित्यिकांना हवाईमार्गे नेण्याचे सौजन्य संयोजकांनी का दाखवले नाही, असा प्रश्न आता औरंगाबादचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या न जाण्याच्या पाश्र्वभूमीवर उपस्थित झाला आहे. डॉ. रसाळांना सत्कारासाठी निमंत्रित करून त्यांना रेल्वेने येण्यास सांगणाऱ्या संयोजकांनी पत्रकारांसाठी मात्र हवाईमार्गाची सोय केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संमेलनासाठी नागपुरातून १५ पत्रकारांना हवाईमार्गे घुमानला नेण्यात आले. त्यांच्या या हवाई प्रवासाचा खर्च केंद्रातील एका वजनदार मंत्र्यांनी उचलला, अशी चर्चा साहित्यवर्तुळात आधीपासून आहे. या पत्रकारांचा हवाई प्रवास सुरक्षित होईल, याकडे संयोजन समितीतील एकाने जातीने लक्ष पुरवले. अशीच तत्परता संयोजकांनी ज्येष्ठ साहित्यिकांच्या बाबतीत का दाखवली नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे. नामवंत कवी ना.धों. महानोर व प्रा. विठ्ठल वाघ रेल्वेने आणि पत्रकार मात्र विमानाने, हे चित्र साहित्यक्षेत्राला शोभणारे नाही, अशी तिखट प्रतिक्रिया एका माजी संमेलनाध्यक्षाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर व्यक्त केली. या संमेलनात राज्यातील अनेक नामवंत साहित्यिक सहभागी झाले नाहीत. रेल्वेचा प्रवास झेपणार नाही, मग जायचे कसे, हाच प्रश्न या सर्वासमोर होता. नामवंत साहित्यिकांची हजेरी या संमेलनाच्या दर्जात भर टाकणारीच ठरली असती. अशा काही ज्येष्ठ साहित्यिकांच्या हवाई प्रवासाची व्यवस्था संयोजकांना सहज करता आली असती. फक्त त्यासाठी प्रायोजक शोधावा लागला असता. मात्र, साहित्यिकांना हवाई सफर घडवण्यापेक्षा पत्रकारांना नेणे केव्हाही फायद्याचे, हाच विचार संयोजकांनी केल्यानेच हा दुजाभाव आता ठसठशीतपणे समोर आला आहे.
संमेलनावर कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या संयोजकांनी ज्येष्ठ साहित्यिकांना विमानाने आणले असते तर अधिक चांगले झाले असते, अशी प्रतिक्रिया लेखक राजन खान यांनी व्यक्त केली. खरे तर यासाठी महामंडळाने पुढाकार घ्यायला हवा होता, असे ते म्हणाले. या संदर्भात स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्याशी वारंवार संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा