दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या आणि मेणबत्त्यांना बाजारात मोठी मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन अलिबागमधील राजमाता जिजाऊ विद्यामंदिरातील गतिमंद विद्यार्थ्यांंनी विविध प्रकारच्या पणत्या आणि मेणबत्त्यांचे दिवे आणि शुभेच्छापत्रे तयार केले आहेत. गतिमंद विद्यार्थ्यांची ही कलासाधना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय या शाळेतील विद्यार्थ्यांना भेटल्यावर येते. घराघरातून दिपावलीच्या सणाची तयारी अद्याप सुरु झाली नसली, तरी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरु केली आहे. विविध रंगांच्या, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या, दिवे, मेणबत्त्या शुभेच्छा पत्रे, आकाश कंदील, फुलदाणी, रंगीबेरंगी झुंबर, कागदी फुले अशा एक ना अनेक वस्तुंची निर्मिती शाळेतील गतिमंद विद्यार्थ्यांनी केली आहे.

देशात मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा अस्तित्वात असला तरी गतिमंद विद्यार्थ्यांंच्या शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. अशा विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देणाऱ्या शाळाच अस्तित्वात नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग परिसरातील गतिमंद विद्यार्थ्यांसाठी पाठबळ सामाजिक विकास संस्थेने राजमाता जिजाऊ विद्यामंदिरची सुरुवात केली आहे. कुरुळ येथील आरसीएफ कॉलनीत सुरु असलेल्या या शाळेत आज २८ गतिमंद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शालेय शिक्षणाबरोबर मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेत केला जातो. मुलांकडून वेगवेगळ्या वस्तुंची निर्मिती केली जाते. रक्षाबंधनासाठी राख्या, दिवाळीसाठी पणत्या, आकाश कंदील, ख्रिसमसच्या आधी मेणबत्या तयार करुन घेतल्या

जातात. तर वर्षभर शोभेच्या वस्तू, ग्रिटींग्ज, फाईल्स, कागदी पिशव्या बनवण्याचे काम सुरु असते. विद्यार्थी मन लावून हे काम करीत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात. यातून मिळणारे मानधन शाळेतील मुलांसाठी खर्च केला जातो.

यंदाच्या दिवाळीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी अडीच हजार पणत्या तयार केल्या आहेत. याशिवाय ४०० मेणबत्त्या आणि दिवे तयार करण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठेत यांची विक्री केली जाणार आहे.

मानसिक व्यंगांमुळे या मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे तो बदलणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले घरातील सर्व काम, बागकाम, कार्यशाळांमधील काम चांगल्या पद्धतीने करू शकतात. असे मुख्याध्यापिका सीमा रिवद्र विषे यांनी सांगीतले.  तर अपंगांसाठी शासकीय नोकऱ्यामंध्ये ३ टक्के आरक्षणाची तरतूद असली तरी गतिमंदांना त्याचा फायदा मिळत नाही. यासाठी शासकीय पातळीवर जागृती निर्माण करणे गरजेचे आहे असे मत शाळा व्यवस्थापन कमिटीचे माजी सदस्य नागेश कुलकर्णी यांनी व्यक्त  केले.