अलिबाग : शिधापत्रिका धारकांच्या ई केवायसी करण्याकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत होते. हीबाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणिकरणासाठी मेरा ई केवायसी अँप विकसित करण्यात आले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना घरबसल्या आता ई केवायसी करता येणार आहे.

लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत होत्या. कनेक्टीव्हीटी नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रमाणीकरणासाठी तासंतास वाट पहावी लागत होती. या अनुषंगाने शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ ॲप तयार केले असून त्यावरून लाभार्थी दुकानात न जाता स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करू शकतील एनआयसीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी  हे ॲप सुरू केले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी)  करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार रेशनकार्डला आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे. आधार प्रमाणीकरण नसल्‍यास रास्‍त भाव धान्‍य दुकानात रेशन न देण्‍याचे निर्देश पुरवठा विभागाने दुकानदाराना दिले होते. परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार प्रमाणीकरणा अभावी हजारो लाभार्थी हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

रायगड जिल्ह्यात जवळपास ५ लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक राहिले आहे. राज्यातील इतर भागातील परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यामुळे घरच्या घरी आधार प्रमाणीकरण करता यावे यासाठी मेरा ई केवायसी हे अँप विकसित करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिक आणि लहान मलांना घरच्या घरी मोबाईलच्या साह्याने आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

या  अँपच्या माध्यमातून लाभार्थ्‍यांना घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करता येईल. चेहऱ्याची पडताळणी करून हे प्रमाणिकरण केले जाईल. मात्र, त्यासाठी आधार क्रमांक मोबाइलशी लिंक असणे आवश्यक असणार आहे. ही सेवा फक्त राज्यातील लाभार्थ्यांसाठी असणार आहे..

रेशन दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणेकरून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी धान्यापासून वंचित रहाणार नाहीत. –    सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड</strong>

रायगड जिल्ह्यातील आकडेवारी

एकूण शिधापत्रिकाधारक ४ लाख ५३ हजार

एकूण लाभार्थी १७ लाख ५६ हजार

आधार पडताळणी झालेले १२ लाख १६ हजार

ई केवायसी प्रलंबित ५ लाख ३८ हजार

Story img Loader