राज्यात इतरत्र एलबीटी करामध्ये दरवाढ झाली नसताना केवळ कोल्हापूर महापालिकेने दरवाढ करून व्यापा-यांचे कंबरडे मोडले आहे. वाढवलेला कर त्वरित मागे घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाला असहकार्य करण्यात येईल, असा इशारा शनिवारी जिल्हा व्यापारी उद्योजक महासंघाने सहाय्यक आयुक्त नितीन देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीवेळी दिला. यावेळी महापालिकेचे एलबीटीप्रमुख संजय सरनाईक यांनी एलबीटीमध्ये केलेली दरवाढ व जुना कर याचा अभ्यास करून आठ दिवसांमध्ये सर्वमान्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर महापालिकेने एलबीटी करामध्ये २५ टक्क्य़ांहून अधिक दरवाढ केली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. देशात इतर राज्यात एलबीटी कर आकारला जात नसताना केवळ महाराष्ट्रातच तो आकारला जात असल्याबद्दल व्यापा-यांचा जोरदार विरोध आहे. त्यासाठी सातत्याने आंदोलनेही केली जात आहेत. अशातच महापालिकेने एलबीटी करात वाढ केल्याने व्यापा-यांनी आंदोलनाचा झेंडा हाती घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात व्यापारी उद्योजक महासंघाची बैठक होऊन त्यामध्ये महापालिकेच्या धोरणाविरूध्द संताप व्यक्त करण्यात आला. बैठकीत एलबीटी कर लागू करणा-या सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा मुद्दाही चर्चेला आला. या मुद्दय़ावरून व्यापा-यांच्यात उलट सुलट प्रवाह असल्याचे दिसून आले. महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी एलबीटीला व्यापा-यांचा विरोध असल्याने ते त्यांची मतदानाविषयीची भूमिका मतदानातूनच व्यक्त करतील, असे स्पष्ट केले. दरम्यान शनिवारी व्यापारी महासंघाने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भेट घेऊन एलबीटी करवाढप्रश्नी चर्चा केली. त्यांना दिलेल्या निवेदनात व्यापा-यांना एलबीटी मुळातच मान्य नसताना पुन्हा त्यामध्ये वाढ करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे म्हटले आहे. एलबीटीची दरवाढ कायम ठेवल्यास प्रशासनाला असहकार्य करण्याबरोबरच आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या चर्चेत सदानंद कोरगांवकर, गणेश बुरसे, संजय रामचंदाणी, विनोद कापडिया, गणेश शहा आदींनी भाग घेतला.
एलबीटी मागे न घेतल्यास आंदोलनाचा व्यापारी-उद्योजक महासंघाचा इशारा
राज्यात इतरत्र एलबीटी करामध्ये दरवाढ झाली नसताना केवळ कोल्हापूर महापालिकेने दरवाढ करून व्यापा-यांचे कंबरडे मोडले आहे. वाढवलेला कर त्वरित मागे घेण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
First published on: 06-04-2014 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Merchant businessmen federation warning of movement of lbt not back