जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकर सहकारी पतपेढीच्या (ग. स. सोसायटी) ११३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळाची परंपरा कायम राखली गेली. संस्थेतील नोकर भरतीचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक यांना एकत्र येण्यामागील कारण असल्याचा आरोप करीत सभासदांनी २० खोके संचालक ओकेच्या घोषणा देत रोष प्रगट केला. नेहमीप्रमाणे प्रचंड गोंधळात विषयांना मंजुरी देत अवघ्या काही मिनिटात सभेचे कामकाज गुंडाळले गेले. सभेत ठरवून गोंधळ घातला गेला की सभासदांचे म्हणणे ऐकायचे नव्हते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सभेत सत्ताधाऱ्यांनी सभासदांचे काहीही ऐकून न घेता ती आटोपती घेतल्याचा आरोप अनेकांनी केला. सोसायटीच्या सभेत गोंधळ घालण्याची परंपरा यंदाच्या वार्षिक सभेतही पाहावयास मिळाली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे सहकार, लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना गटाचे सर्व संचालक एकत्र आल्याने सभासदांमध्ये रोष पसरला. लवकरच संस्थेत नोकरभरती होणार आहे. त्यात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना काही जागा देऊन आपलेसे केल्याचा आरोप करण्यात आला. नोकर भरतीत आर्थिक मलिदा लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक गळय़ात गळे घालत असल्याचा आरोप करीत यावरून घोषणा देत सभासदांनी निषेध केला.
सभेत सहकार गट आणि प्रगती शिक्षक सेना गटाचे सभासद एकमेकांना भिडले. अभूतपूर्व गोंधळात संस्थेची वार्षिक सभा अवघ्या १० मिनिटांत गुंडाळण्यात आली. राष्ट्रगीताचाही अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला. व्यासपीठावर आजी-माजी संचालकांसह सत्ताधारी आणि विरोधकही होते. यात उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संचालक अजबसिंग पाटील, अजय देशमुख, कर्ज समितीचे अध्यक्ष योगेश इंगळे, ग. स. प्रबोधिनीचे अध्यक्ष मंगेश भोईटे, लोकसहकार गटाचे गटनेता सुनील सूर्यवंशी, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह अन्य संचालकांचा समावेश होता.
सभेच्या पूर्वसंध्येला सर्व गटांचे मनोमीलन
चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग. स. सोसायटीच्या निवडणुकीत सहकार गट, लोकसहकार गट व प्रगती शिक्षक सेना गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. मात्र, सभेच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी सहकार गटाच्या संचालकांसोबत लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना गटाच्या सर्व संचालकांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. त्यामुळे सर्वामध्ये मनोमीलन झाल्याचे चित्र दिसून आले होते. पत्रकार परिषदेत मागील आर्थिक वर्षांत प्राधिकृत अधिकारी मंडळाने मंजूर केल्यानुसार सभासदांना यावर्षी सहा टक्के लाभांश आणि ८०० रुपये बैठक भत्ता वाटप करण्यात येणार असल्याच्या माहितीसह संस्थेच्या वाटचालीबाबत सांगण्यात आले होते. खेळते भांडवल १०६०.४९ कोटी, सभासद वर्गणी ७२७२ कोटी, सभासद ठेवी १३९.४६ कोटी, राखीव निधी ३५.७४ कोटी तर संस्थेची गुंतवणूक १०३.३६ कोटी रुपये आहे. संस्थेचा सात कोटी ७४ लाखहून अधिकचा नफा झाल्याची माहिती देण्यात आली.
३४ हजारांवर सभासद
संस्थेची ३४ हजार ५८१ सभासद संख्या आहे. पण सभेत केवळ दीड हजार सभासदांची उपस्थिती होती. भत्त्यासाठी सकाळपासून २७ हजार १८८ सभासदांनी हजेरी लावली. त्यामुळे त्यांना सभेतील निर्णयांशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून आले. दिवसभरात भत्त्यापोटी दोन कोटी १७ लाख ५० हजार ४०० रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सभास्थळ परिसरात दरवर्षी बाजार भरतो. व्यावसायिकांकडून दुकाने थाटली जातात. भत्त्यापोटी मिळणाऱ्या रकमेतून सभासदांकडून खरेदी होते. त्यातून कोटय़वधींची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले.