सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत वावरणाऱ्या काँग्रेस पक्षाला तब्बल १५ वर्षांनंतर विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच गोंधळ घालून काँग्रेसच्या सदस्यांनी विरोधकांची भूमिका चोखपणे बजावली. त्यामुळे शोकप्रस्ताव मांडण्याआधीच सभागृह अर्धा तास तहकूब करावे लागले.
दुष्काळ, धान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्यावर राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. त्यांनी २८९च्या प्रस्तावावर परिषदेत चर्चा करण्याची मागणी केली. हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे, पण परिषदेची पहिल्या दिवशीची प्रथा मोडू नका, अशी विनंती सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केल्यानंतर ‘वंदे मातरम्’ झाले. मात्र, पुन्हा एकदा ठाकरे आणि इतर सदस्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. वंदे मातरम्, मंत्र्यांचा परिचय, सभापती-तालिका, शोकप्रस्ताव, असा परिषदेचा पहिल्या दिवसाच्या कामकाजाचा क्रम होता. विरोधकांनी या क्रमाची मोडतोड करत सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांपैकी एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी पहिल्या दिवसाच्या कामकाजाचा हवाला देत विरोधकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.
सभापती उभे असताना तुम्ही कसे काय बोलू शकता, असा सवाल खडसे यांनी ठाकरे यांना केला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणाबाजीला अधिकच उधाण आले. खडसेंनी रोखण्याचा प्रयत्न करताच ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘शेतकरी आवाज दाबणाऱ्या सरकारचा निषेध असो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्त्यांच्या मुद्यावर सरकार झोपलेले नाही. या दोन्ही मुद्यावर सरकार ‘पॅकेज’ तयार करत आहेत. चर्चेला आमची ना नाही, पण नियम बाजूला सारून चर्चेचा निर्णय घेता येत नाही. कामकाज नियमाप्रमाणे चालू द्या, अशी विनंती खडसे यांनी विरोधकांना केली. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले, पण त्याचवेळी सभागृहाची प्रतिष्ठाही महत्त्वाची आहे. दुखवटय़ाचा विषय बाजूला सारून प्रस्तावावर चर्चा करता येणार नाही. सभागृहात पहिल्या दिवशी प्रश्नोत्तरे नसले तरीही प्रस्ताव मांडताना तो कसा योग्य, हे यावेळी तटकरे यांनी सांगितले.