यवतमाळ जिल्ह्य़ात व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची व्यापारपेठ व आर्णी बाजार समितीचा मोठा व्याप असतांना व्यापाऱ्यांच्या अडेलतट्ट धोरणापायी आज स्थितीत हजारो िक्वटल हरभरा बाजार समितीच्या शेडमध्ये पडून असतांना बाजार समिती मात्र व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यास निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांचे मात्र हाल होतांना दिसत आहे.
निसर्गाच्या कोपामुळे आधीच खचलेला शेतकरी आपला हरभरा घेऊन बाजार समितीच्या शेडमध्ये विक्रीसाठी आणला असता गारपिटीमुळे हरभरा बट्टेल असल्याचे सांगत व्यापारी खरेदीच्या दृष्टीने कानाडोळा करीत आहे. त्यामुळे विक्रीस आणलेला हजारो क्विंटल हरभरा पडून आहे. विशेष म्हणजे, सुप्रसिध्द असलेल्या या बाजार समितीत धान्य खरेदीसाठी केवळ ४-५ व्यापारी असल्याने शेतकऱ्यांची मोठी कुंचबना होतांना दिसत आहे. पांढऱ्या हरभऱ्यासाठी व्यापारी बोली बोलत असून बट्टेल हरभऱ्याला मात्र १५०० रुपयापर्यंत बोली बोलली जात आहे. हरभऱ्याचे भाव व्यापारी मंडळींनी साखळी करून पाडल्याची चर्चा सुध्दा शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे. एका महिन्यात १२ हजार िक्वटल हरभऱ्याची खरेदी आर्णी बाजार समिती अंतर्गत करण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली आहे. ३ एप्रिलपासून दुसऱ्या टप्प्याच्या खरेदीला प्रारंभ झाला असला तरी मध्यंतरी ५ ते ६ दिवसाच्या सुटीने हरभऱ्याची वाढती आवक मोठय़ा प्रमाणात झाली. आणि हीच परिस्थिती लक्षात घेऊन त्याचा फायदा व्यापारी खरेदीदारांनी आपापल्या परीने घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हरभऱ्याचे भाव सुध्दा १५०० ते ३८०० पर्यंत दिले जात असून रोज १५०० िक्वटलपर्यंत हरभऱ्याची खरेदी व काटा होत असल्याचेही बाजार समितीकडून सांगण्यात आले. आवक व खरेदी यामध्ये तफावत दिवसेंदिवस वाढत असल्याने बाजार समितीचे दोन्ही शेड हरभऱ्यामुळे खचाखच भरले आहे आणि त्याची रखवाली शेतकरी करतांना दिसत आहे. आर्णी बाजार समितीत सुमारे १० वर्षांपासून ४ ते ५ व्यापारी का, हा सुध्दा चच्रेचा प्रश्न आहे. जिल्हाभरातून तसेच माहूर, किनवट भागातून येथे हजारो िक्वटल धान्य विक्रीसाठी येते व बराच माल खुल्या बाजारात सुध्दा विकला जातो. या संदर्भात बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून पारदर्शकता ठेवून योग्य अशा व्यापाऱ्यांनाच खरेदीची संधी देण्यात आल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांवर खरेदीसंदर्भात अन्याय होणार नाही, याची काळजी सुध्दा बाजार समिती घेत असल्याचे त्यांनी लोकसत्तांशी बोलतांना स्पष्ट केले.
प्रस्तुत प्रतिनिधीने बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर फेरफटका मारला असता मन हेलावून सोडणारे चित्र दिसून आले. शेतकऱ्यांना अस्मानी संकटानंतर सुलतानी संकटाला तोंड देत आपला हरभरा विकण्यासाठी जीवाची रान करण्याची पाळी आलेली दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील येणारे पाणी केव्हा थांबेल याचा विचार व्यापारी व संबंधीत यंत्रणा यांनी निश्चितपणे करण्याची गरज आहे.

Story img Loader