पाणी टंचाईचा तीव्र सामना करीत असलेल्या शहरातील विविध नगरातील महिलांनी मोर्चा काढून जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याच्या अंगावर काळी शाई फेकून आपला संताप व्यक्त करण्याच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोच मंगळवारी समतानगर, गाडगेनगर व तुकडोजी नगरवासीयांनी २४ तासात पाणी मिळाले नाही, तर प्रचंड आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याच्या कार्यालयात जाऊन संतप्त आंदोलन करून टेबल-खुच्र्यांची तोडफोड केली.
यासंबंधीची माहिती अशी, शहरातील पृथ्वीराजनगर, पाटीपुरा, उमरसरा, तुळजानगर आदी नगरात पाणी टंचाईवर योग्य तोडगा काढण्यासाठी शनिवारी, मनसेच्या नेतृत्वाखाली महिलांनी रौद्ररूप धारण करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश देशकर यांच्यावर शाई फेकून आपला संताप व्यक्त केल्यावर दोन महिन्यापासून पाण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या समतानगर, गाडगेनगर, तुकडोजी नगरवासीयांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता दारव्हेकर यांच्या कार्यालयात जाऊन संतप्त आंदोलन करून टेबल-खुच्र्यांची तोडफोड केली.
शहरातील पाणी प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नागरिकांतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. तरीदेखील ही समस्या सुटत नाहीत. त्यामुळे संतप्त पुरुष व महिलांना मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जीवन प्राधिकरणाचे अभियंता दारव्हेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशा घटना असे प्रसंग
आपल्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेले लोक मोच्रे काढून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा जो प्रकार अलीकडे करत आहे त्याचा अनुभव यापूर्वी यवतमाळकरांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. कुलधारिया कापूस पणन महासंघाचे विभागीय अधिकारी असतांना त्यांच्या कार्यालयावर संतप्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढून त्यांच्या तोंडाला केवळ काळी शाईच फासली नव्हती, तर त्यांची िधडही काढली होती. देवराव जिभकाटे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक असतांना शिवसेनेने मोर्चा काढून त्याच्या कार्यालयात धडक दिली होती. संतप्त शिवसनिकांनी जिभकाटे यांच्या तोंडाला काळी शाई फासली होती, पण कमालीचा संयम ठेवत जिभकाटे यांनी आंदोलकांना शांत करून चक्क चहा पाजून त्यांचा राग शांत केला. पोलिसात तक्रार करण्याऐवजी जिभकाटे घरी गेले. आंघोळ करून कपडे बदलवून परत आपल्या कार्यालयात कामाला लागले. सिंचन विभागातील अभियंता चौधरी यांना आंदोलकांनी त्यांच्या कार्यालयात चार तास कोंडून टाकले होते. जीतेन पापळकर हे निवासी उपजिल्हाधिकारी असतांना शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शंभर कार्यकर्त्यांंसह कार्यालयात घुसून पापळकरांना तीन तास कोंडून घोषणाबाजी केली होती. पापळकरांनी संयमाने परिस्थिती हाताळून आंदोलकांना शांत केले होते.