राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी विस्कळीत झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी झालेल्या राजकीय संघर्षांमुळे कदम यांनी गेल्या वर्षी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्यामुळे चिपळूण तालुक्यातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते तटकरेंबरोबर नेहमी दिसत असत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तटकरेंना राष्ट्रवादीने रायगड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात युतीतर्फे विद्यमान खासदार अनंत गीते मुख्य विरोधी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असले तरी कदम यांनीही शेतकरी कामगार पक्षातर्फे या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून राजकीय गोंधळ उडवून दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचा फायदा अंतिमत: तटकरेंनाच होईल, असा अंदाज आहे. पण निवडणूक काळात प्रचारासाठी अत्यंत गरजेचे असलेली कार्यकर्त्यांची कुमक कदमांना रत्नागिरी जिल्ह्य़ातून आणि विशेषत: चिपळूण तालुक्यातून न्यावी लागणार आहे. गेल्या आठवडय़ात पेणला त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या मेळाव्यालाही चिपळूणच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष रिहाना बिजले, माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक प्रचाराच्या काळात हे कार्यकर्ते कदमांसह रायगड मतदारसंघात अडकून पडले तर त्याचा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीला बसणार आहे.
दरम्यान या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने चिपळूण नगरपालिकेतील पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक घेऊन त्यांनी कदम यांच्या प्रचारात सहभागी होऊ नये अशी तंबी दिली. बैठकीत या नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना पक्षनिष्ठेची हमी दिली असली तरी प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा त्याची अंमलबजावणी होणे कठीण दिसत आहे. कारण मागील नगरपरिषद निवडणुकीत कदम यांच्याच नेतृत्वाखाली यापैकी बहुसंख्य सदस्य निवडून आले असून नगर परिषदेतील सत्ताधारी गटावर त्यांचीच पकड आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा