विनायक मेटे हे राष्ट्रवादीच्या ताकदीवर मोठे झाले. परंतु त्यांची स्वत:ची महत्त्वाकांक्षी वाढली. या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेमुळेच त्यांनी राष्ट्रवादी सोडून महायुतीशी घरोबा केला. त्यांचा फुगा लवकरच फुटेल. मेटे यांना पुन्हा कधीही राष्ट्रवादीत थारा मिळणार नाही, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी आर. आर. पाटील यांनी करमाळय़ात दौरा केला. त्या वेळी ते म्हणाले, मराठा ओबीसी आरक्षणासाठी शासनाने नारायण राणे यांची समिती यापूर्वीच गठीत केली असून, या समितीने आपला अहवालही सादर केला आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. केवळ लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे तात्काळ निर्णय घेणे शक्य नव्हते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणारच होता. परंतु विनायक मेटे यांनी केवळ स्वत:च्या महत्त्वाकांक्षेतून महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महायुतीतच राहावे, अशा सदिच्छा आर. आर. पाटील यांनी उपरोधिक शैलीत दिल्या. मेटे हे महायुतीत गेल्यामुळे राष्ट्रवादीवर कोणताही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
माढय़ासह राज्यात सर्वत्र आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून महायुतीचा फुगा निवडणूक निकालानंतर फुटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा