राज्यात पुढील आठवड्यात मान्सूनच्या आगमनाची नांदी मिळाली, पण पाऊस मात्र अजूनही थांबायचे नाव घेत नाही. येणारा पाऊस अवकाळी की मान्सूनपूर्व याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे.
मार्च महिन्यापासून राज्यात विशेषतः विदर्भात अवकाळी पावसाने जोर धरला. यामुळे शेतपिकाचे, बागाईतदारांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर १५ दिवस उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्र होरपळला असताना आता हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २९ आणि ३० मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २७ मे पासूनच हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली.
हेही वाचा >>> नागपूर : प्रदूषणाविरोधात लढा तीव्र, १७ वर्षीय यामिनीची आर्त हाक; व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे २९ आणि ३० मे रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर कालावधीत देशात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या काही भागात जेथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय देशाच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जून महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.