अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कारभारात २००१ ते २००९ या कालावधीत सुमारे ३३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सचिव तथा ‘एमफुक्टो’ या प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह माजी प्राचार्य एस. आर. चौधरी या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.
खान्देश शिक्षण मंडळातील गैरकारभाराचे प्रकरण अनेक दिवसांपासून गाजत आहे. २००१ ते २००९ या कालावधीत अनामत ठेव आणि परत ठेव रकमेत सुमारे ३३ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप संस्थेचे तत्कालीन सचिव व माजी प्राचार्य शिवाजी पाटील, माजी प्राचार्य एस. आर. चौधरी, तत्कालीन संचालक विनोद पाटील, सुदेश गुजराथी यांच्यासह आठ पदाधिकाऱ्यांविरोधात २०१० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात पाटील व चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यांना जामीन मंजूर झाला होता. या निर्णयाविरोधात संस्थेचे तत्कालीन संचालक दिलीप जैन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन देण्याचा निर्णय रद्दबातल करीत दोघांना १५ दिवसांत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाटील व चौधरी हे दोघे अमळनेर पोलिसांना शरण गेले. त्यांना अटक झाल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Story img Loader