आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा देत एम.फुक्टो.ने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर शनिवारी जोरदार निदर्शने केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आदर करून अंमलबजावणी करा, प्राध्यापकांना द्वेषभावनेने वागवू नका, अशा मागण्यांचे फलक दाखवून प्राध्यापकांनी जोरदार निदर्शने केली. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाला बचत भवनात चर्चेसाठी बोलाविले. प्रा. विवेक देशमुख, डॉ. नारायण मेहेरे, डॉ. एकनाथ आदमने, प्रा. भैयासाहेब दुंदल यांचा शिष्टमंडळात समावेश होता. राज्यपालांकडे आणि राष्ट्रपतींकडे आपण आघाडी सरकारच्याबरखास्तीची मागणी केली आहे काय, असा सवाल उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच प्राध्यापकांना केला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे प्राध्यापकांच्या बाजूने १६ निकाल असूनही एकाही निर्णयाची अंमलबजावणी सरकार करीत नसेल तर आम्ही दुसरे काय करावे, असा उलट सवाल शिष्टमंडळाने केला तेव्हा मात्र उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी आजच चर्चा करून काही तरी तोडगा काढतो, असे आश्वासन अजितदादा पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि जिल्ह्य़ाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शनिवारी यवतमाळात आले होते तेव्हा एलआयसी चौकात एम.फुक्टो.ने जोरदार निदर्शने केली.

Story img Loader